वाळवा : नागठाणेचे तीर्थक्षेत्र व्हावे, अशी माझीही ओढ निर्माण झाली आहे. माणसापेक्षा, सरकारपेक्षा आपण सर्वांनी नागठाणेचे तीर्थक्षेत्र बनविण्याचे ठरविले, तर ते शक्य आहे. गेल्या ७० वर्षांत जे झाले नाही ते तुम्ही एकसंध झाल्यास घडू शकते. त्यासाठी तुम्हाला ‘मेक इन नागठाणे’ वाटले पाहिजे, असे प्रतिपादन सहकार व पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.नागठाणे (ता. पलूस) येथील उत्तरवाहिनी कृष्णा परिसर विकास संस्थेतर्फे सोमवार, दि. १ ते ५ मे या कालावधित कन्यागत महापर्वकाळ सोहळा व कृष्णाकाठ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त राज्यस्तरीय कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून देशमुख बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. पतंगराव कदम होते. यावेळी व्यासपीठावर आमदार मोहनराव कदम, सुमनताई पाटील, अनिल बाबर, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, काँग्रेसचे प्रदेश चिटणीस आनंदराव मोहिते, हुतात्मा संकुलाचे वैभव नायकवडी, क्रांतीचे अरुण लाड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख उपस्थित होते.देशमुख म्हणाले, नागठाणे तीर्थक्षेत्र परिसर विकासासाठी, उत्तरवाहिनी कृष्णा परिसर विकास संस्थेकडून ३१ कोटी रुपयेचा आराखडा सरकारकडे देण्यात आला आहे. नागठाणेचे तीर्थक्षेत्र व्हावे, अशी माझीही इच्छा आहे. तुम्ही एकसंध झाला तर हे चित्र नक्कीच बदलू शकते. दरम्यान, सकाळी ८ वाजता आमदार मोहनराव कदम यांच्याहस्ते ध्वजारोहण करुन संदीप कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली धार्मिक विधीने नागठाणे परिसरातील ग्रामदेवतांना अभिषेक करण्यात आला. दुपारी महाप्रसाद वाटप करण्यात आले. मुख्य मंडपात नागठाणे येथील नागेश्वर भजनी मंडळाचे भजन झाले. तसेच संप्रेक्षण विधी, उदकशांती, प्रायश्चित विधीही पार पडला. सायंकाळी ५ वाजता कृष्णातिरी उभारण्यात आलेल्या शामियान्यात पालकमंत्री सुभाष देशमुख हस्ते कन्यागत महापर्वकाळ सोहळ्याचे दीपप्रज्वलन आणि बालगंधर्व व शिवशंकर प्रभू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.बालगंधर्व विद्यालयाच्या मुलींनी स्वागतगीत गायिले. संयोजक संस्था सचिव आनंदा कोरे यांनी स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष सुहास पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सरपंच माधुरी जोशी, भरत पाटील, सुषमा जाधव, वंदना माने आदी उपस्थित होते. अशोक पाटील यांनी आभार मानले.सोमवार, दि. १ रोजी शिरीष भेडसगावकर यांचे ‘संस्कृत काल आज आणि उद्या’ या विषयावर व्याख्यान झाले. तसेच नागठाणेच्याच १५० नाट्यरंगकर्मी कलाकारांनी उभारलेल्या महाराष्ट्र संस्कृती दर्शनद्वारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विविध वेशभूषा व संस्कृतीचे सादरीकरण करण्यात आले. याचे संयोजन प्रा. अरुण कापसे यांनी केले होते. यावेळी सीमा मांगलेकर, माधुरी जोशी, भरत पाटील, सुरेंद्र वाळवेकर, नितीन नवले, मधुसूदन बर्गे, किरण शिंदे, प्रताप मोकाशी, आनंदा कोरे, सुहास पाटील, सुषमा जाधव, वंदना माने उपस्थित होते.मंगळवारी दुसऱ्यादिवशी सकाळी ७ वाजता करवीर पीठाचे जगत्गुरू शंकराचार्य विद्यानृसिंह भारती, पीरपारसनाथ महाराज, श्री गोरक्षनाथ महाराज पाटील रामदासी, निर्मलस्वरुप महाराज, हणमंतबुवा रामदासी, जगदाळे महाराज, साध्वी लीलाताई रामदासी यांनी शाही स्नान केले. पीरपारसनाथ महाराज यांनी नागेश्वर मंदिरात महापूजा केली. त्यानंतर भाविकांनी स्नान केले. तत्पूर्वी ग्रामदेवतांची महापूजा करण्यात आली. शाहीस्नानानंतर गंगापूजन करण्यात आले. याचवेळेस गणपती पूजन, महारुद्राभिषेक आरंभ, अग्निस्थापना करण्यात आली. सप्तशती पाठवाचन व वेद पारायणारंभ करण्यात आला. जगदगुरु शंकराचार्य यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले. यानंतर मुख्य मंडपात सरस्वती महिला भजनी मंडळाने भजन सादर केले. सायंकाळी ६.३० ते ७.३० दरम्यान महाआरती व अष्टावधानसेवा झाली. (वार्ताहर)पुण्यात जमली : नागठाणेत मात्र नाही..आमदार पतंगराव कदम म्हणाले, ३० वर्षे बालगंधर्व स्मारक कुठे करायचे, हा प्रश्न सुटलेला नाही. नागठाणेकर फार हुशार आहेत. बालगंधर्वांच्या स्मारकाच्या जागेचा प्रश्न त्यांनी इतकी वर्षे सुटू दिला नाही. पुण्यात सदाशिव पेठेतील प्रश्नात मी यशस्वी झालो, पण इथे यश आले नाही. ते म्हणाले, मंत्री सुभाष देशमुख यांचे सरकारमध्ये वजन आहे. तेव्हा नागठाणे तीर्थक्षेत्रासाठीची मागणी त्यांनी मार्गी लावावी. नरसोबा वाडीला १७५ कोटी मिळतात, तेव्हा नागठाण्यालाही काहीतरी मिळवून द्या. तुमच्या मोदी लाटेतही ही मंडळी मला निवडून देतात, हीच आमच्या कामाची पोहोच आहे.
नागठाणेचा तीर्थक्षेत्र म्हणून विकास व्हावा
By admin | Published: May 03, 2017 12:09 AM