इस्लामपूर : इस्लामपूर शहराचा नियोजित विकास आराखडा रद्द होण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांच्यापुढे विरोधकांना एकत्र करण्याचे आव्हान आहे. सोमवारी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सदाभाऊ खोत, वैभव पवार, एल. एन. शहा मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्याचे समजते. परंतु विरोधी गटातील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल महाडिक, पालिकेचे विरोधी पक्षनेते विजय कुंभार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व नगरसेवक आनंदराव पवार, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाटील याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.खासदार राजू शेट्टी यांनी विरोधकांना एकत्र करून इस्लामपूर नगरपालिकेची निवडणूक लढविण्याचा विडा उचलला आहे. तत्पूर्वी शहराचा विकास आराखडा कसल्याही परिस्थितीत रद्द करण्यासाठी आपण प्रयत्न करु, असे आश्वासन राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांनी दिले होते.याला अनुसरूनच सोमवारी राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह माजी नगरसेवक वैभव पवार, एल. एन. शहा यांनी एक निवेदन तयार केले. त्यावर विक्रम पाटील वगळता इतरांच्या स्वाक्षऱ्या घेऊन थेट मुंबई गाठली. ते मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्याचे समजते. मात्र याची पुसटशी कल्पनाही इतर विरोधकांना येऊ दिली नाही. त्यामुळे या विरोधकांमध्ये वाद असल्याचे समोर आले आहे.याबाबत विक्रम पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आपण कोणत्याही निवेदनावर स्वाक्षरी केलेली नाही. यापूर्वी अशी बरीच निवेदने मुंबईला गेली आहेत. आनंदराव पवार म्हणाले की, माझी स्वाक्षरी निवेदनावर घेण्यात आली आहे. परंतु मुंबईकडे जाण्याबाबत काहीही कल्पना दिली नाही. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल महाडिक व विद्यमान सदस्य सम्राट महाडिक यांनाही अंधारात ठेवण्यात आले आहे. वैभव पवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. परंतु खा. राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांनी भ्रमणध्वनी उचलला नाही. (प्रतिनिधी)विरोधक अनभिज्ञ राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, वैभव पवार, एल. एन. शहा यांनी निवेदन करुन स्वाक्षऱ्या घेऊन थेट मुंबई गाठली. ते मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्याचे समजते. याची पुसटशी कल्पनाही विरोधकांना येऊ दिली नाही. विरोधक याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.
विकास आराखडा; विरोधकांतच मतभेद
By admin | Published: April 25, 2016 11:25 PM