कडेपूर : आज सर्वजण शेतीमालास योग्य भाव द्यावा अशी मागणी करत आहेत. शेती उत्पादनाचे भाव ठरलेले आहेत. मात्र शेतकºयाकडे जेंव्हा माल असतो, तेव्हा सगळ्या शेतीमालाचे भाव पडलेले असतात, हा अनुभव आहे. जोपर्यंत शेतकरी शेतीमालास किफायतशीर दर देत नाहीत, तोपर्यंत देशाचा खºयाअर्थाने विकास होणार नाही, असे प्रतिपादन विधिमंडळातील ज्येष्ठ सदस्य आमदार गणपतराव देशमुख यांनी केले.हणमंतवडिये (ता. कडेगाव) येथे पनवेलचे माजी आमदार विवेक पाटील यांना क्रांतिवीर भाई भगवानराव पाटील सामाजिक पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. आमदार मोहनराव कदम, आमदार बाळासाहेब पाटील, वैभव नायकवडी, क्रांतिवीरांगना हौसाताई पाटील प्रमुख उपस्थित होते.यावेळी गणपतराव देशमुख म्हणाले, भगवानराव पाटील यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर आपले संपूर्ण आयुष्य शेतकरी, कष्टकरी, दलितांसाठी जगले. शेतकरी व कामगारांच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे, यासाठी नवा विचार देण्याचे काम केले. जोपर्यंत शेतकरी शेतीमालास किफायतशीर दर देत नाहीत, तोपर्यंत देशाचा खºयाअर्थाने विकास होणार नाही.आ. मोहनराव कदम म्हणाले, भगवानराव पाटील यांचे कार्य मोठे होते. त्यांच्या कार्याची माहिती भावी पिढीस होण्यासाठी त्यांचा पुतळा आणि स्मारक उभे राहणे गरजेचे आहे. सत्कारमूर्ती माजी आमदार विवेक पाटील म्हणाले, या पुरस्कारामुळे माझ्या भावी जीवनासाठी आदर्शवादी जीवन जगण्यास स्फूर्ती मिळेल. विरोधात राहूनही लोकांची कामे चांगल्या पध्दतीने करू शकतो, हे मी दाखवून दिले आहे. जशी स्वातंत्र्यपूर्व काळात परिस्थिती होती, तशीच परिस्थिती आज देशात सुरू आहे. या व्यवस्थेविरूध्द लढण्यासाठी तरूण पिढीने संघर्ष करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.आमदार बाळासाहेब पाटील, वैभव नायकवडी, जयराम मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. विश्वनाथ गायकवाड यांनी मानपत्र वाचन केले. विद्यार्थी किमया पाटील आणि उत्कर्ष पाटील यांनी गीत सादर केले.कार्यक्रमास अंधकवी चंद्रकांत देशमुखे, संपतराव पवार, खानापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रतापराव साळुंखे, शेकापचे जिल्हाध्यक्ष शरद पाटील, आनंदराव पाटील, आत्माराम मोरे, भीमराव मोरे, इंद्रजित पाटील, सदानंद माळी, रघुराज मेटकरी, दमयंती पाटील उपस्थित होते. अॅड. सुभाष पाटील यांनी स्वागत केले. सागर पाटील यांनी आभार मानले.
शेतीमालास दर मिळाल्याशिवाय विकास अशक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 11:48 PM