कुरळप : मागील दीड वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर देत भाजपमध्ये येण्याची विनंती केली होती, मात्र पाटील यांनी तेव्हा नकार देत खासदार शरद पावर यांची साथ सोडणार नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या वावड्यांवर विश्वास ठेऊ नये, असे वक्तव्य राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी केले. कुरळप (ता. वाळवा) येथील हनुमान पाणी पुरवठा संस्थेच्या निर्वाह निधी वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.पाटील म्हणाले, अजित पवार यांना ज्यांनी आमदार, खासदार, मंत्री केले, त्यांनाच ते सोडून गेले. मात्र त्यांच्या अगोदरच जयंत पाटील यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर होती, पण ते भाजपमध्ये गेले नाहीत. यातून शरद पावर यांच्याबद्दलची निष्ठा दिसून येते. सध्याचे राजकारण दूषित झाले असून शरद पवार यांना त्रास देण्याचे काम भाजप करत आहे. राम मंदिर बांधल्याचे श्रेय भाजप घेत आहे. मात्र लोकनेते राजाराम बापू पाटील यांनी साखराळे येथे साखर कारखाना कार्यस्थळावर १९८२ मध्येच राम मंदिर उभारले आहे. मात्र बापूंनी त्याची कधी जाहिरात केली नाही. पाटील म्हणाले, जयंत पाटील यांची पक्ष निष्ठा पाहून शरद पावर यांचा नेहमीच त्यांच्यावर वरदहस्त राहिला आहे. यामुळेच आज ते मुख्यमंत्रीपदाचे खरे दावेदार आहेत.
'जयंत पाटीलांना देवेंद्र फडणवीसांनी दिली होती मुख्यमंत्रीपदाची ऑफर'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 3:33 PM