सांगली : विधानसभेतील विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, शनिवारी सकाळी सांगली दौऱ्यात जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कोविंड टीमचे त्यांनी कौतुक केले.राज्याचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोरोना पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याचा पाहणी दौरा करण्यासाठी आले होते. यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कोव्हिड १९ टीमच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांना सांगली जिल्ह्यातील कोरोनाच्या गंभीर परिस्थिती विषयी माहिती देण्यात आली.
कोरोनाग्रस्त रुग्णांना व्हेंटिलेटर,ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे रुग्ण दगावत आहेत, खाजगी रुग्णालयात अनामत रक्कम जमा केल्याशिवाय उपचार होत नसल्याची विदारक परिस्थिती निदर्शनास आणली.भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कोविंड टीम करत असलेल्या विविध कामांबद्दल यावेळी फडणवीस यांना माहिती देण्यात आली. व्हेंटिलेटरची व ऑक्सिजन यांची उपलब्धता होण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न व्हावेत, यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाची दखल फडणवीस यांनी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.यावेळी भाजप युवा मोर्चाचे कोरोनाच्या काळात करत असलेल्या कामाचे कौतुक केले. कार्यकर्त्यांच्या पाठीशी सदैव असल्याचे आश्र्वासन देऊन असेच काम यापुढेही चालु ठेवण्याचे सांगून त्यांनी या कार्यकर्त्यांची कौतुकाने पाठ थोपटली. यावेळी सांगलीतील भाजप युवा मोर्चा कोव्हिड टीम उपस्थित होती.