लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस श्री गोरक्षनाथांच्या दर्शनासाठी शिराळ्यात आले. जवळपास एक तास त्यांनी येथे घालविला. मात्र याची खबरबात तालुक्यातील एकाही भाजपच्या नेत्याला, कार्यकर्त्याला नव्हती. त्यांच्यासोबत केवळ खासदार संजयकाका पाटील होते. महापुराच्या व कोरोनाच्या संकटातून बाहेर काढा, अशी प्रार्थना फडणवीस यांनी गोरक्षनाथांना केली.
पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी फडणवीस कोल्हापूर येथे शुक्रवारी (दि. ३०) आले होते. तेथे त्यांनी महादेवराव महाडिक, धनंजय महाडिक यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सम्राट महाडिकही उपस्थित होते. त्यानंतर त्यांची मोटार दुपारी चारच्या दरम्यान अचानक शिराळ्याकडे निघाली. नेते, कार्यकर्त्यांसह शासकीय यंत्रणेलाही याची माहिती नव्हती. पोलिसांना मात्र फडणवीस येत असल्याची माहिती अचानक मिळाली. फडणवीस यांनी यावेळी काही ठिकाणी पाऊस व महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. मात्र शासकीय यंत्रणेला माहिती नसल्याने त्यांनी कोठे-कोठे भेट दिली, हे समजू शकले नाही.
पाहणीनंतर फडणवीस थेट येथील गोरक्षनाथांच्या मंदिरात आले. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि येथील मठाधिपती पीर योगी पारसनाथ हे एकाच परिवारातील आहेत. योगी आदित्यनाथ येथील मठाधिपती पारसनाथ यांना मोठे भाऊ मानतात. पारसनाथ महाराज जाहिरातबाजी, प्रसिद्धीपासून दूर असतात. खासदार संजयकाका पाटील दर आठवड्यास येथे भेट देतात. त्यामुळे येथील मठाधिपती पारसनाथ, आनंदनाथ महाराज यांच्याशी खासदार पाटील यांचे घनिष्ठ संबंध निर्माण झाले आहेत. त्यातूनच खासदार पाटील यांनी फडणवीस यांना येथे दर्शनासाठी आणले होते. जवळपास एक तास ते येथे थांबले होते. श्री गोरक्षनाथांच्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मठाधिपती पीर योगी पारसनाथ यांचे आशीर्वाद घेऊन ते परतीच्या प्रवासाला निघाले.