अविनाश कोळी, लाकेमत न्यूज नेटवर्क, सांगली: अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बुधवारी प्रतिकात्मक पारंपारिक देवीचा गोंधळ घालून शासनाला साकडे घातले. भाजी-भाकरी आंदोलनही यावेळी करण्यात आले. जिल्हा परिषदेसमोर झालेल्या या आंदोलनात वाळवा तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी सहभाग घेतला.
जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधनात वाढ करा, त्यांना शासनाच्या सेवेत सहभागी करून घ्या, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी, भविष्य निर्वाह निधीचा लाभ द्यावा, सहा महिन्यांनी महागाई निर्देशांकानुसार मानधनात वाढ करावी आदी विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
बुधवारी देवीचा गोंधळ घालून शासनाला साकडे घालण्याचे प्रतिकात्मक आंदोलन करीत लक्ष वेधले. अधिवेशन संपले असले तरी आंदोलन सुरुच राहणार आहे. तीन जानेवारीस सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्यावेळी पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.या आंदोलनात जिल्हाध्यक्षा अरुणा झगडे, जिल्हा कार्याध्यक्ष विजया जाधव, सचिव नादिरा नदाफ, उपाध्यक्षा अलका विभूते, नीलप्रभा लोंढा, अलका माने आदी सहभागी झाले होते.