शिरढोण : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर विठ्ठलवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे पंढरपूरला देवदर्शनासाठी निघालेल्या शिरहट्टी (ता. हुक्केरी) येथील भाविकांचा ट्रक उलटल्याने २५ ते ३० जण जखमी झाले. शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता ही घटना घडली.
शिरहट्टी (ता. हुक्केरी) येथील २५ ते ३० भाविक ट्रकमधून (क्र. केए २३-४८८५) पंढरपूरला देवदर्शनासाठी निघाले होते. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग वरुन पंढरपूरच्या दिशेने येत असताना विठ्ठलवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे राज्यमार्गाचे काम मध्येच थोडे अपुरे आहे. याचा अंदाज ट्रकचालकास आला नाही. महामार्गावर मध्ये मातीचा रस्ता पाहून चालकाने एकदम ब्रेक मारल्याने गाडी खड्ड्यात आदळून रस्त्यावरच उलटली. अपघातात बसमधील २५ ते ३० भाविक जखमी झाले. ट्रकमधील साहित्य रस्त्यावर विखुरले. अचानक घडलेल्या या प्रकाराने भाविक भांबावले.
घटनेची माहिती कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात मिळताच निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहायक निरीक्षक शिवाजी करे यांच्यासह पथक घटनास्थळी धावले. तत्काळ जखमींना उपचारासाठी कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालय दाखल केले. या अपघाताची नोंद कवठेमहांकाळ पोलिसात झाली आहे.
काम अपुरे, वारंवार अपघात
याठिकाणी राज्य मार्गाचे काम सुरु झाल्यापासून वारंवार अपघात होत असतात. या अपघाताचे कारण राज्यमार्गाचे राहिलेले अपुरे काम असून त्या राहिलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी नागरिक करत आहेत.
तहसीलदारांकडून परतीची व्यवस्था
अपघातस्थळी कवठेमहांकाळचे तहसीलदार बी. जे. गोरे यांनी भेट देऊन, किरकोळ जखमी असलेल्या नागरिकांना कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात उपचार देऊन त्यांच्या गावी शिरहट्टीस जाण्यासाठी कवठेमहांकाळ आगाराची बस उपलब्ध करून दिली.