लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने आठवडा बाजार बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार इस्लामपूर शहरात गुरुवारच्या आठवडा बाजारातील बाजारकट्टे ओस पडले होते. शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. पालिकेच्या आरोग्य विभागानेही बाजार भरणार नाही याची दक्षता घेतली होती.
शहरामध्ये गुरुवारी आणि रविवारी अशा दोन दिवशी आठवडा बाजार भरतो. यावेळी शहरासह आजूबाजूच्या गावांमधून भाजीपाला पिकविणारे शेतकरी, व्यापारी येत असतात. त्यामुळे तहसील कचेरीजवळचा परिसर भाजी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या तोबा गर्दीने उसळून गेलेला असतो. या दोन दिवशी किमान १० हजारांहून अधिक नागरिकांची गर्दी असते. त्यामुळेच प्रशासनाने कठोर पावले उचलत गर्दी होणारे हे ठिकाण आठवड्यातून दोन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मागील वर्षीच्या मार्चदरम्यान इस्लामपूर शहराने तब्बल ५० दिवसांचा लॉकडाऊन पाळत कोरोनावर मात केली होती. कोरोनाचा हा कटू अनुभव पाठीशी असल्याने पुन्हा वाढत्या कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी गर्दी न करता संपर्क साखळी तोडण्यासाठी शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे.