कुपवाड : शहरातील भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक धनपाल खोत व त्यांच्या पत्नी सुलोचना खोत यांनी बुधवारी भारतीय जनता पक्षातील अंतर्गत राजकारणाला व भाजपच्या मंत्र्यांच्या दुय्यम वागणुकीला कंटाळून भाजपला रामराम ठोकला. याप्रकरणी लवकरच शहर व परिसरातील निष्ठावंत कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढील दिशा ठरविणार असून, येत्या निवडणुकीत शहरातून भाजपचे समूळ उच्चाटन करणार असल्याचा इशाराही खोत यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत दिला.
कुपवाड शहरातील दबदबा असलेले नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. खोत तत्कालीन कुपवाड ग्रामपंचायत, नगरपरिषद आणि सध्या महापालिकेच्या राजकारणात कार्यरत आहेत. ते१९९२ ते ९५ या कालावधित सरपंच होते. त्यानंतर नगरपरिषद झाल्यावर त्यांच्या पत्नी सुलोचना खोत नगराध्यक्षा होत्या. महापालिका अस्तित्वात आल्यावर धनपाल खोत यांनी १९९८ मध्ये स्थायी समितीचे सभापतीपद भूषविले होते.
सुरुवातीला कॉँग्रेसमध्ये असलेल्या खोत यांनी महाआघाडीच्या काळात राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांच्याशी जवळीक साधली. मागील निवडणुकीवेळी त्यांनी कुपवाड विकास आघाडीच्या माध्यमातून शहर व परिसरात स्वत:चे उमेदवार उभे केले. यावेळी आघाडीतून पती-पत्नी विजयी झाले. ते आजपर्यंत आघाडीचे नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी २००९ मध्ये भाजपशी जवळीक साधली होती.
खोत म्हणाले की, कुपवाडच्या विकासाच्या मुद्द्यावर भाजपमध्ये गेलो होतो. भाजपचे मंत्री व आमदारांनी सांगली, मिरजेच्या विकासाकडे लक्ष दिले. परंतु कुपवाडकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे माझी निराशा झाली आहे. भाजपमधील नेत्यांनी समाजात तेढ निर्माण केली आहे. पक्षात एकमेकांचे हेवेदावे काढत आहेत. तरीही मी त्यांना सध्याच्या निवडणुकीसाठी उमेदवार निवडीचे अधिकार व कार्यक्षम उमेदवारांबाबत अट घातली होती. त्यांनी ती फेटाळून लावली. याला कंटाळून मी व माझ्या पत्नीने भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
आता इतर पक्षात प्रवेश करायचा की अपक्ष लढायचे, हा निर्णय लवकरच कार्यकर्त्यांची बैठक घेऊन ठरविणार आहे. शहरात ज्यांनी ज्यांनी प्रयोग केले आहेत, त्यांची फसगत झाली आहे. कुपवाडची जनता किती हुशार आहे, हे त्यांना लवकरच कळेल. शहरातील जनता पैशाच्या जोरावर विकत घ्यायची भाजपचे धोरण आहे. कुपवाडमधील जनता कदापीही विकली जाणार नाही. मी व माझे उमेदवार निवडून आल्यानंतर त्यांना भाजपच्या दावणीला बांधण्यापेक्षा त्यांची साथ सोडलेली बरी, हा निर्णय मी पक्का केला आहे. येत्या निवडणुकीत भाजपचे कुपवाड शहरातून समूळ उच्चाटन केल्याशिवाय गप्प बसणार नाही. भाजपला माझी व कुपवाडवासीयांची ताकद दाखवून देणार आहे, असा इशाराही खोत यांनी दिला.
मंत्र्यांकडून कार्यकर्त्यांना दुजाभावाची वागणूक....भाजप केंद्र व राज्यात सत्तेत नसताना मी पक्षात प्रवेश केला होता. आता सत्ता असताना मी बाहेर पडलो आहे. यापूर्वी सत्ता नसताना काही नेते,मंत्री माझ्या घरी शंभरवेळा चकरा मारत होते. आता सत्तेच्या मोहापायी त्यांना कार्यकर्त्यांचा विसर पडला आहे. त्यांना फोन किंवा मेसेजद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यावर ते मुद्दाम कार्यकर्त्यांना टाळतात. त्यामुळेच मी पक्ष सोडत आहे, अशी टीकाही खोत यांनी भाजपच्या मंत्र्यांवर केली.