इस्लामपूर : तत्कालीन फडणवीस सरकारने धनगर समाजासाठी एक हजार कोटींची केलेली घोषणा पोकळ ठरली. मात्र, महाआघाडीचे सरकार येत्या अर्थसंकल्पात धनगर समाजासाठी भरीव तरतूद करून समाजात विश्वास निर्माण करेल, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
येथील राजारामबापू नाट्यगृहात महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघाचे नूतन प्रदेशाध्यक्ष ॲड. चिमण डांगे यांचा जयंत पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे अध्यक्षस्थानी होते. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी आमदार रामहरी रूपनवर, आमदार मानसिंगराव नाईक प्रमुख उपस्थित होते. पाटील म्हणाले, आरक्षण हा धनगर समाजाचा कळीचा प्रश्न आहे. आमचे सरकार धनगर समाजास आरक्षण मिळण्याबरोबर समाजातील तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी जे-जे करणे शक्य आहे, ते-ते करेल. चिमण डांगे यांच्या पाठीशी ताकद उभी करू.
दत्तात्रय भरणे म्हणाले, चिमण डांगे एक शांत व संयमी नेते आहेत. ते समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत आहेत. मी त्यांच्या पाठीशी उभा राहीन.
अण्णासाहेब डांगे म्हणाले, खासदार शरद पवार समाजास आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करीत असताना, काही नेत्यांनी बारामतीला त्यांच्या घरावर मोर्चा नेऊन भाषणातून लाखोली वाहिल्याने आरक्षण लटकत गेले. रूपनवर म्हणाले, धनगर समाजास राज्यात एनटी, केंद्रात ओबीसी, तर घटनेत एसटीचे अशी तीन आरक्षणे आहेत. मात्र, याचा काही उपयोग नाही.
चिमण डांगे म्हणाले, अण्णासाहेब डांगे यांनी गेल्या २८ वर्षांत महासंघ राज्याच्या वाडी-वस्त्यांवर नेत समाजाचे हित जपले आहे. आप्पांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर टक्कर घेत जे रक्त सांडले, ते वाया जाऊ देणार नाही.
यावेळी महासंघाचे प्रा. अरुण घोडके यांचा सत्कार करण्यात आला. शिवाजी वाटेगावकर यांनी स्वागत केले. जि.प. सदस्य संभाजी कचरे यांनी प्रास्ताविक, तर सुनील मलगुंडे यांनी आभार मानले. संदीप तांबवेकर, बजरंग कदम यांनी सूत्रसंचालन केले. इंद्रजित मोहिते, ॲड. बी. एस. पाटील, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम एडगे, नगरसेवक विश्वनाथ डांगे, पांडुरंग काकडे, प्रकाश कनप, देवराज पाटील, आनंदराव मलगुंडे, सचिन हुलवान आदी उपस्थित होते.
फोटो : २६ इस्लामपूर १
ओळी- इस्लामपूर येथे ॲड. चिमण डांगे यांचा सत्कार जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी दत्तात्रय भरणे, अण्णासाहेब डांगे, रामहरी रूपनवर, डॉ. इंद्रजित मोहिते, ॲड. बी. एस. पाटील, संभाजी कचरे, शिवाजी वाटेगावकर उपस्थित होते.