सांगली : मलेशियात नोकरीच्या आमिषाने सुशिक्षित बेरोजगार तरुणांना गंडा घातल्याप्रकरणी अटकेत असलेला पोलिसपुत्र कौस्तुभ पवार याचा फरारी साथीदार धीरज बाळासाहेब पाटील (वय २८, रा. पाटणे प्लॉट, हरिपूर रस्ता, सांगली) यास अटक करण्यात शहर पोलिसांना रविवारी दुपारी यश आले.गेल्या आठवड्यात धीरज पाटील व कौस्तुभ पवार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल होता. कौस्तुभला चार दिवसांपूर्वी अटक केली आहे. सध्या तो पोलिस कोठडीत आहे. धीरज पाटील हा गुंगारा देत फरारी होता. नातेवाईकांच्या चौकशीत तो मलेशियात असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्याचा शोध थांबला होता.
तो पुणे जिल्ह्यातील सप्तश्रृंगी येथे आश्रयाला असल्याची माहिती शहर पोलिसांना शनिवारी मिळताच पोलिस पथक तातडीने रवाना झाले होते. रविवारी दुपारी तो सापडला. त्याला घेऊन सायंकाळी पथक सांगलीत दाखल झाले. त्यास सोमवारी दुपारी जिल्हा न्यायालयात उभे केले जाणार आहे.संशयित कौस्तुभ पवार व त्याचा मित्र धीरज पाटील या दोघांनी मलेशियात चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून गुरुनाथ कुंभार (रा. शिरवळ, जि. सोलापूर), मोहन शिंदे (बेलवंडी, जि. अहमदनगर), दीपक माने (मानेवाडी, जि. सोलापूर) व सदानंद धनगर (जळगाव) या चौघांकडून पाच ते सहा लाख रुपये घेतले. मलेशियात गेल्यानंतर या तरुणांना हॉटेलमध्ये वेटरची नोकरी मिळाली.वर्किंग व्हिसा नसल्याने मलेशिया पोलिसांनी या तरुणांना अटक केली होती. चारही तरुणांना न्यायालयाने तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सध्या हे तरुण शिक्षा भोगत आहेत.व्हिसा फसवणूक प्रकरणाचा मास्टरमार्इंड धीरज पाटील हाच असल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून पुढे आली होती. काही महिन्यांपूर्वी धीरज पाटील हा स्वत: मलेशियात नोकरीसाठी गेला होता. तिथे परदेशी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या काही व्यक्तींशी त्याची ओळख झाली.
तेथून भारतात परतल्यानंतर त्याने थेट मलेशियामध्ये रोजगार देण्याचा व्यवसायच सुरू केला. त्याचा हा व्यवसाय अनेक दिवसांपासून बिनबोभाटपणे सुरू होता. मात्र या फसवणूक प्रकरणामुळे तो उघडकीस आला. कौस्तुभ पवार हा त्याच्याकडे बेरोजगार तरुण घेऊन जात असे. या बदल्यात कौस्तुभला तो कमिशन देत होता.संशयितांची संख्या वाढणार!मुख्य सूत्रधार धीरज पाटील याला अटक झाल्याने आणखी कोणाचा सहभाग आहे का, हे स्पष्ट होईल. मलेशियात तो कोणाच्या माध्यमातून तरुणांना नोकरी लावत होता, याचा उलगडा होईल, असे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक समीर चव्हाण यांनी सांगितले. ते म्हणाले, धीरजसह कौस्तुभ पवारचे बँक खाते गोठविले आहे. तरुणांची फसवणूक करुन त्यांनी मिळविलेल्या पैशाचे नेमके काय केले? याचाही उलगडा यावेळी केला जाईल.