सांगली : कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूमागे सर्वात महत्त्वाचे कारण ठरतेय ते को-मोर्बिडीटी. मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी, हृदयरोग असलेल्या रुग्णांना कोरोनाचा सर्वात जास्त धोका आहे. गेल्या दोन महिन्यात ४४६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यात ९० टक्के मृतांना मधुमेह, उच्चदाब, न्यूमोनिया असे आजार होते.
गतवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर जुलैपर्यंत परिस्थती नियंत्रणात होती. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला. या काळात कोरोनामुळे मृत्यूची संख्याही वाढली. ऑक्टोंबरपासून मार्च २०२१पर्यंत पुन्हा सामान्य स्थिती होती. कोरोना रुग्णांची संख्याही कमी झाली होती. त्यामुळे मृत्यूचे प्रमाणही अगदीच नगण्य होते. मार्च महिन्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले. या महिन्यात ४६ जणांचा मृत्यू झाला. तर १ एप्रिल ते २७ एप्रिल या काळात कोरोनाने ४०० जणांचा बळी घेतला आहे.
कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूमागे नेमके कोणते कारण असावे, याविषयी आरोग्य विभागाकडूनही ऑडिट केले जाते. यात मधुमेह, रक्तदाब, किडनी, हृदयरोग आदींसह सहव्याधी असलेल्या रुग्णांचा मृत्यूचा आकडा सर्वाधिक आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी प्रशासनाने जिल्ह्यातील सहव्याधी लोकांचे सर्वेक्षण केले होते. यात महापालिका क्षेत्रात ------ तर ग्रामीण भागात ८८८५७ लोकांना सहव्याधी असल्याचे समोर आले होते. त्यात सर्वाधिक रुग्ण हे उच्च रक्तदाबाचे होते. त्याखालोखाल मधुमेहाच्या रुग्णांची संख्या होती. सहव्याधी नसलेल्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही सर्वाधिक आहे. त्यामुळे सहव्याधी असलेल्या लोकांनी कोरोनाच्या काळात विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत आहे.
चौकट
नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसताच तातडीने कोरोना चाचणी करून घ्यावी. त्यातही सहव्याधी असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. मधुमेह, उच्चदाब व इतर व्याधी असलेल्या नागरिकांनी घराबाहेर पडूच नये. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. घरातील व्यक्ती बाहेर जात असेल तर त्याच्यापासूनही सामाजिक अंतर ठेवावे, असे जिल्हा लसीकरण अधिकारी डाॅ. विवेक पाटील यांनी सांगितले.
चौकट
जिल्ह्यात कोरोनामुळे आज अखेर झालेले मृत्यू : २२०६
सहव्याधीमुळे झालेले मृत्यू : १९००
सहव्याधी नसतानाही मृत्यू : ३०६