विकास शहा
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा-वाळवा तालुक्यातील ५० हिरकणींनी पहाटेच्या चित्तथरारक वातावरणात कळसूबाई शिखराच्या चढाईची अपूर्व कामगिरी अनुभवली.
डोंगर-दऱ्यांची कसलीही माहिती नसताना रोजच्या चाकोरीबद्ध जीवनाला बगल देत एक वेगळा साहसी अनुभव त्यांनी घेतला.
सांगलीच्या सह्याद्री ट्रेक्स अँड ॲडव्हेंचर ग्रुप या संस्थेच्या सहकार्याने रविवार, दि. १४ मार्च रोजी पहाटेच्या ३ ते ६ या वेळेत ही मोहीम सुरू झाली. अंधाराची तमा न बाळगता १६४६ मीटर उंच असणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई शिखर अडीच ते तीन तासांत शिराळा-वाळवा तालुक्यातील महिला शिक्षक भगिनींनी सर केले.
वैभव बंडगर, युवराज साठे, दिलीप गोसावी, नंदिनी हवालदार, करुणा मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली कळसूबाई शिखर ट्रेकिंगचे आयोजन केले होते. या ट्रेकिंगमध्ये ५० ते ५५ वर्षांच्या सुवर्णलता गायकवाड, सुवर्णा बच्चे, सुनीता पाटील, भारती माने, सुजाता शेटे, मीना चव्हाण या भगिनींनी स्वयंप्रेरणेने सहभाग घेतला होता. याशिवाय नंदिनी हवालदार, करुणा मोहिते, अंजली यादव, वर्षा शिनगारे, स्वाती देसाई, शारदा रोकडे, मनीषा कुरणे, संगीता आदाटे, विनिता गुरव, आदी महिलांनी शिखर चढण्याचा वेगळा अनुभव घेतला.