मिरज : मिरजेतील कृष्णाघाट स्मशानभूमीत महापालिकेने लाखो रुपये खर्चून बसविलेली डिझेल दाहिनी गेली दीड वर्षे बंद अवस्थेत आहे. महापुरात बंद पडलेल्या डिझेल दाहिनीची दुरुस्ती व तांत्रिक चाचणीही पूर्ण झाली आहे. मात्र, डिझेल दाहिनी चालण्यासाठी ठेकेदाराची नेमणूक केली नसल्याने कोरोनाकाळात मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी गैरसोय सुरू आहे. महापालिकेतील मिरजेतील कारभारी व पदाधिकाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष आहे.
दीड वर्षांपूर्वी महापुराचे पाणी शिरल्याने मिरज कृष्णाघाट येथील डिझेल दाहिनी बंद पडली. अनेक दिवस पाण्यातच असल्याने डिझेल दाहिनीची उद्ध्वस्त झाली. महापूर ओसरल्यानंतर डिझेल दाहिनी दुरुस्तीकडेही महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले. डिझेल दाहिनी बंद असल्याने अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांचे हाल सुरू होते. गतवर्षी मार्च महिन्यात कोरोना साथीमुळे मृतांची संख्या वाढली. जिल्ह्यात कोविडमुळे मृत रुग्णांवर मिरजेतच अंत्यसंस्कार करण्यात येत असल्याने मिरज-पंढरपूर रस्त्यावरील स्मशानभूमीचा वापर कोरोना मृतांसाठी सुरू झाला. त्यामुळे कृष्णाघाट स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या मृतांच्या संख्येत वाढ झाली.
आधार सेवा संस्थेने डिझेल दाहिनी सुरू होण्यासाठी पाठपुरावा केल्याने दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. महिन्यापूर्वी डिझेल दाहिनीची चाचणीही घेण्यात आली. मात्र, अद्याप ठेकेदाराची नेमणुकीसाठी निविदा काढण्यात आलेली नाही. महापालिका आरोग्याधिकाऱ्यांना डिझेल दाहिनी चालविण्यासाठी ठेकेदार नियुक्तीसाठी निविदा काढण्यास वेळ नसल्याचे सांगण्यात येत आहे. डिझेल दाहिनी दुरूस्त होऊनसुद्धा वापरात येऊ शकली नसल्याने मिरजकर नागरिकांत संतप्त प्रतिक्रिया आहेत. डिझेल दाहिनीसाठी ठेकेदार नियुक्तीसाठी आधार संस्थेतर्फे आयुक्त, उपायुक्त व आरोग्य विभागाकडे पाठपुराव्यास अद्याप यश आलेले नाही. डिझेल दाहिनी सुरू झाल्यास मृतदेहांवर तातडीने अंत्यसंस्कार करणे शक्य होणार आहे.
चाैकट
कृष्णाघाट स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या मृतांची संख्या वाढत आहे. येथे एकाचवेळी आठ जणांवर अंत्यविधी होऊ शकतात. त्यापेक्षा जास्त संख्या असल्यास तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. डिझेल दाहिनीत केवळ ४५ मिनिटांत अंत्यविधी होत असल्याने डिझेल दाहिनी सुरू झाल्यास नागरिकांची सोय होणार आहे.