अशोक डोंबाळे-- सांगली --जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह यावर्षी भाजप व शिवसेनेनेही कंबर कसली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. परंतु वरिष्ठ पातळीवरून काहीही निर्णय झाला तरी खानापूर, आटपाडी, शिराळा, कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज तालुक्यातील काही जागांवर आम्ही आघाडी करूनच निवडणूक लढविणार, अशी भूमिका घेऊन दोन्ही काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी जानेवारीमध्ये मतदान होणार आहे. या स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसने तालुकानिहाय मेळावे घेऊन कार्यकर्त्यांना रिचार्ज करण्यासाठी कंबर कसली आहे. राष्ट्रवादीनेही जत, आटपाडी, वाळवा येथे मेळावे घेऊन कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या आहेत. यंदा भाजपनेही जिल्हा परिषदेत कमळ फुलविण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. प्रमुख कार्यकर्ते व नेत्यांची दोन दिवसांची कार्यशाळा गुड्डापूर (ता. जत) येथे नुकतीच झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, आरपीआय आठवले गट यांना सोबत घेऊन निवडणूक लढविण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. नेत्यांसमोर आव्हानकाँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी आघाडीचा निर्णय घेण्याआधीच स्थानिक नेत्यांनी राजकीय सोयीनुसार आघाड्या केल्या आहेत. या आघाड्यांचा फायदा आणि तोटा कोणाला होणार, हे आगामी निवडणुकीतच स्पष्ट होणार आहे. काही असले तरी, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या ताब्यात ठेवण्याचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर मोठे आव्हान आहे.खानापूर, आटपाडीत शिवसेना धनुष्यबाणाची चुणूक दाखविणार असून, त्यासाठी आमदार अनिल बाबर, तानाजी पाटील रणनीती आखत आहेत. परंतु, धनुष्यबाणाची धार बोथट करण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, अॅड्. बाबासाहेब मुळीक, काँग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे यांची खेळी सुरू आहे. याची झलक खरसुंडी (ता. आटपाडी) आणि भाळवणी (ता. खानापूर) येथील सोसायटी निवडणुकीत त्यांनी दाखविली आहे. जिल्हा पातळीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली तर ठीक, नाही तर आमची खानापूर व आटपाडीत आघाडी असणारच, असे काँग्रेस व राष्ट्रवादीचे स्थानिक नेते सांगत आहेत. मिरज तालुक्यातील पश्चिम भागामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रभाव आहे. कवठेपिरान आणि कसबे डिग्रज असे दोन जिल्हा परिषद आणि चार पंचायत समिती मतदारसंघ येथे येतात. कवठेपिरानचे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. माने यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेसबरोबर आघाडी करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मिरज पूर्वभागात काँग्रेस-राष्ट्रवादीला भाजपच्या आ. सुरेश खाडे गटाशी सामना करावा लागणार आहे.शिराळ्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक, काँग्रेसचे राज्य सरचिटणीस सत्यजित देशमुख यांची आघाडी निश्चित असल्याचे कार्यकर्ते बोलत आहेत. तेथे आमदार शिवाजीराव नाईक यांचे उमेदवार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेसचा नानासाहेब महाडिक गटही त्यांच्याबरोबर असण्याची शक्यता आहे. वाळवा जिल्हा परिषद गट आणि दोन पंचायत समिती गण परत खेचून आणण्यासाठी क्रांती आघाडीचे नेते व हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांचे प्रयत्न सुरू आहेत. तेथे या सर्वांना राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील गटाशी लढत द्यावी लागणार आहे.राष्ट्रवादीशी आघाडी नाही : मोहनराव कदमकाँग्रेसने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीशी आघाडी करणार नाही. भाजप व शिवसेनेबरोबर आघाडी करण्याचा प्रश्नच नाही. आम्ही स्वतंत्र निवडणूक लढविण्याची तयारी केली असून, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पक्षाचे मेळावे झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद गटनिहाय कार्यकर्त्यांचे मेळावे घेणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी दिली.राष्ट्रवादी स्वबळावरच : विलासराव शिंदेविधानसभा निवडणुका राष्ट्रवादीने स्वबळावर लढल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेस व अन्य पक्षांबरोबर आघाडी करण्याचा प्रश्नच येत नाही. राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणूक लढविण्याची पूर्ण तयारी केली आहे. जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकाही घेणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी दिली.जत तालुक्यातील निवडणूक लक्षवेधी होण्याची चिन्हे...जत तालुक्यातील निवडणूक मात्र लक्षवेधी होणार आहे. तेथे भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि जनसुराज्य पक्ष अशी चौरंगी निवडणूक होणार आहे. जनसुराज्य पक्षाचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील यांची मागील निवडणुकीत राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली होती. पण, सध्या ते राष्ट्रवादीपासून आणि भाजपचे आमदार विलासराव जगताप यांच्यापासूनही दूर आहेत. यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संजीवकुमार सावंत हे जरी सध्या राष्ट्रवादीत असले तरी ते आ. जगताप यांच्याबरोबर जाणार आहेत. काँग्रेसचे विक्रम सावंत, सुरेश शिंदे, पी. एम. पाटील, राष्ट्रवादीचे अॅड. चन्नाप्पा होर्तीकर, रमेश पाटील यांच्या भूमिकाही महत्त्वाच्या आहेत.
जिल्हा परिषदेसाठी आघाड्यांचे पेव फुटणार
By admin | Published: August 13, 2016 11:27 PM