मिरज : चंदनवाडी (ता. मिरज) येथील सिनर्जी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे विजापूर (कर्नाटक) येथील एका महिलेवर पोटातील ६ किलोच्या गाठीची अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली.
ही महिला गेल्या काही वर्षांपासून पोटदुखीच्या आजाराने त्रस्त होती. या महिलेच्या पोटात गाठी असल्यामुळे तिचे पोट फुगत होते. सतत त्रास होत असल्याने ही महिला मिरज येथील सिनर्जी हॉस्पिटल येथे तपासणीसाठी आली. त्यावेळी तिच्या पोटात मोठी गाठ दिसून आली. तसेच या गाठीला आतडे सुद्धा चिकटले होते. या गाठीचे निदान झाल्यानंतर डॉक्टरांनी महिलेस शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याची कल्पना दिली. त्यानंतर दि. १२ फेब्रुवारी २०२१ रोजी या महिलेवर हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. सुरेश पाटील यांच्या देखरेखीखाली जनरल सर्जन डॉ. संतोषसिंह राजपूत, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. स्वप्नाली कोळेकर यांनी तब्बल दोन तास लॅप्रोटोमी ही शस्त्रक्रिया करून गाठ काढली. ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल हॉस्पिटलचे चेअरमन स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रवींद्र आरळी, व्यवस्थापकीय संचालक प्रसाद जगताप यांनी डॉक्टर्स तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.