प्रताप महाडिक
कडेगाव : कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन जाहीर केले असले तरी कोणीही व्यक्ती उपाशीपोटी राहणार अशी घोषणा शासन आणि प्रशासनाने केली आहे. सर्व पात्र शिधापत्रिका धारक कुटुंबाना धान्य मिळेल असे बोलले जात आहे.मात्र ऑनलाइन नोंदणी न झालेल्या केसरी शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळालेले नाही .कडेगाव तालुक्यातील कित्येक केसरी शिधापत्रिकाधारक ऑनलाईन प्रक्रियेतील तांत्रिक अडचणीमुळे वंचित आहेत.
आपल्या प्रशासनाने परराज्यातील नागरिकांनाची धान्य जेवणाची व्यवस्था केली आहे. हे संकटकाळात करणे योग्यच आहे . मात्र कडेगाव तालुक्यातील कित्येक केसरी शिधापत्रिका धारक असलेल्या नागरिकांना ऑनलाइन नोंदणी केलेली नसल्याने रेशन धान्य मिळण्यापासून वंचित राहावे लागले आहे. याबाबत शासनस्तरावर वेळीच निर्णय घेणे गरजेचे आहे.
शासनाने केशरी शिधापत्रिकाधारकांनी कार्डावर आरसी नंबर घेऊन नोंदणी केली होती .मात्र अजूनही त्यांची शासनाच्या प्रणालीतील तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाइन नोंदणीही झालेली नाही. त्यामुळे त्यांना ऐन गरजेच्या वेळी रेशन दुकानात धान्य मिळाले नाही .संचारबंदी असल्यामुळे दाद कोणाकडे मागायची हा प्रश्नही त्यांच्यासमोर उभा आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव पाहून शासनाने सगळीकडे लॉक डाऊन केले आहे. त्यामुळे काम बंद झाले. शासनाने लॉक डाऊन केला असला तरी कोणीही अन्नावाचून उपाशी राहणार नाही असे सांगितले आहे. ज्यांच्या शिधापत्रिकाची ऑनलाइन नोंदणी केली असेल त्यांनाच दिले आहे. मात्र वंचितांना न्याय कधी मिळणार हा प्रश्न आहे .प्राधान्य कुटुंब लाभार्थीं शिधापत्रिका धारकाप्रमाणेच ज्या केसरी शिधापत्रिका धारकांचे उत्पन्न ४४ हजाराच्या आत आहेत व त्या अद्याप ऑनलाईन झाल्या नाहीत अशा शिधापत्रिका धारकांना ऑफलाईन पद्धतीने सवलतीच्या दरातच धान्य द्यावे. तसेच जे रेग्युलर केसरी शिधापत्रिका धारक आहेत आणि त्यांचेही ऑनलाईन झाले नाही अशा शिधापत्रिका धारकांना देखील ऑफलाईन ने धान्य द्यावे अशी मागणी होत आहे.ऑफ लाईन नोंद घ्यावी : सतीश मांडके सरपंच शिरसगाव ज्याचे शिधापत्रिकाची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्यांनी तात्काळ नोंद व्हावी.यामध्ये काही तांत्रिक अडचण असेल तर ऑफलाईन पद्धतीने नोंद करावी. अन्यथा प्रशासनाने या वंचित कुटुंबाना धान्य व जीवनावश्यक वस्तूंची किट देऊन त्यांची समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा .