दिघंची : भवानीमळा (दिघंची) येथील भवानी पाणंद रस्ता गेल्या कित्येक वर्षांपासून चिलारीच्या विळख्यात सापडला आहे. भवानी मंदिरापासून माणगंगा नदीपर्यंतच्या या पाणंद रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
दिघंचीपासून तीन किलोमीटरवर भवानी मंदिर आहे. वर्षभर हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. हे भाविक भवानी पाणंद या रस्त्याने ये-जा करतात. या पाणंदीला आता चिलारी वनस्पतीने विळखा घातल्यामुळे सुमारे पाच कि.मी. अंतरावरून वळसा मारून यावे लागत आहे.
भवानी व यमाई या दोन्ही मंदिरांकडे जाण्यासाठी हा जवळचा एकमेव रस्ता आहे.
भाविकांना चिलारीतून रस्ता शोधत जावे लागत आहे. या लगत अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी चिखलातून जावे लागते. दोन ते तीन महिने यात पाणी साचून राहते.
श्रावण महिन्यात दोन्ही देवीच्या दर्शनाला भाविक येत असतात. अनेक शैक्षणिक सहली याठिकाणी येतात; परंतु भवानी मंदिराला येणाऱ्या मार्गाला चिलारीने विळखा घातल्यामुळे लोकांना लांबून पायपीट करावी लागत आहे. प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे.
कोट
प्रशासनाने लक्ष घालून रस्ता लवकर करावा.
-
संजय कुलकर्णी, शेतकरी, पांढरेवाडी-भवानीमळा