अतुल जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कदेवराष्ट्रे : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे जन्मगाव असलेल्या देवराष्ट्रेत ग्रामपंचायत सरपंचपद खुले असल्याने निवडणुकीत चुरस वाढली आहे. अंतर्गत कुरघोड्यांमुळे काँग्रेससाठी सोपी वाटणारी ही निवडणूक सध्या गटा-तटाच्या अवघड घाटात अडकली आहे. तसेच भाजप नेत्यांचेही सूर जुळता जुळेनासे झाले आहेत. सध्या दोन्ही गटांनी बैठकांवर जोर दिल्याचे चित्र आहे.देवराष्ट्रेत ५ प्रभागात ५ हजार ४५६ मतदार असून १५ जागांसाठी निवडणूक लढविली जाणार आहे. सरपंचपद खुले असल्याने मोठी चुरस असून प्रकाश मोरे, आनंदराव मोरे, नारायण साळुंखे, प्रमोद गावडे, अजित मोरे, माणिक मोरे, तानाजी महिंद हे या पदासाठी इच्छुक आहेत.कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रेची निवडणूक नेहमीच लक्षवेधी ठरत असते.
डॉ. पतंगराव कदम यांचे निष्ठावंत कार्यकर्ते माजी उपसभापती मोहनराव मोरे व सोनहिरा साखर कारखान्याचे संचालक पोपट महिंद यांनी या ग्रामपंचायतीवर कायम काँग्रेस पक्षाची सत्ता ठेवली आहे. पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यात देवराष्ट्रे गट वगळता सर्वत्र काँग्रेसचे पानिपत झाले, पण देवराष्ट्रेकरांनी आपला गड कायम राखला. काँग्रेसमधील एकीने भाजपची लाट थोपवली. हीच एकी कायम राहिली, तर देवराष्ट्रे ग्रामपंचायतीवर काँग्रेसची सत्ता कायम राहील, असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत
सध्या काँग्रेसअंतर्गत गटबाजीने भाजपमध्ये उत्साह संचारला आहे. भाजपचे नेते धोंडीराम महिंद, तानाजी महिंद, अजित मोरे यांनी देवराष्ट्रे ग्रामपंचायतीत वर्षानुवर्षे असलेली काँग्रेसची सत्ता उलथविण्याचा चंग बांधला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी यासाठी मोठे बळ उभे केले आहे.
काँग्रेसअंतर्गत असलेल्या दुफळीने दुसºया गटाने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. दीपक शिंदे, प्रमोद गावडे, नारायण साळुंखे यांनी जोरदार मोर्चेबांधणी करीत पॅनेल उभे करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे काँग्रेसअंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. गटबाजी मिटविण्यासाठी डॉ. पतंगराव कदम, आमदार मोहनराव कदम यांनी प्रयत्न चालविले आहेत.
काँग्रेस कार्यकर्त्यांमधील अंतर्गत असंतोष निवडणुकीच्या तोंडावर चव्हाट्यावर येत आहे. तो थोपविण्यात नेत्यांना अपेक्षित यश येत नसल्याने निष्ठावंत कार्यकर्ते नाराज दिसत आहे. भाजपने ५ प्रभागात उमेदवार निश्चित केल्याचे समजते. पण काँग्रेसचे उमेदवार पाहूनच भाजप आपली उमेदवारी ठरविणार, हे निश्चित.समझोता एक्स्प्रेस : घसरली.....!गावात पाच प्रभाग असून १० बुथवर मतदान होणार आहे. यामध्ये प्रभाग १ व २ चे मतदान मराठी शाळेत, तर प्रभाग ३ ते ५ मधील मतदान यशवंतराव हायस्कूलमध्ये होणार आहे.