शीतल पाटील ।सांगली : बालवाडी प्रवेशासाठी शहरातील अनेक नामवंत शाळांनाही विद्यार्थी मिळेनासे झाले आहेत. गेल्या तीन ते चार वर्षातच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी बालवाडी प्रवेशासाठी पालकांच्या रांगा लागत होत्या. यंदा महापालिका क्षेत्रात बालवाडीच्या पाचशेवर जागा रिक्त राहणार आहेत. भविष्यात बालवाडी प्रवेशासाठीची सोडत पद्धत बंद करावी लागण्याची भीती असून, इंग्रजी माध्यमाकडे वाढलेला ओढा व आरटीईच्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचा बालवाडी प्रवेशावर परिणाम झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
महापालिका क्षेत्रातील बालवाडी प्रवेशाची प्रक्रिया शिक्षण मंडळाच्यावतीने राबविली जाते. प्रवेश प्रक्रियेची घोषणा होताच अर्ज घेण्यासाठी शाळांसमोर लांबच लांब रांगा लागत असत. पहाटेपासून पालक रांगेत उभे राहत. हे अनुभवलेल्या सांगलीतील चित्र गेल्या तीन-चार वर्षात बदलले आहे. त्या रांगा संपल्या असून, बालवाडीच्या जागा रिक्त राहू लागल्या आहेत. यंदाचे चित्रही त्यापेक्षा वेगळे नाही.
बालवाडी प्रवेशासाठी महापालिका क्षेत्रातील २६ शाळांमधील ५१ तुकड्यांमध्ये २,४७० प्रवेश क्षमता आहे. त्यासाठी १९६१ अर्जांची विक्री झाली आहे. पाचशे जागा रिक्त राहिल्या आहेत. सांगली शिक्षण संस्थेसह मिरजेतील काही शाळांचा अपवाद वगळता, क्षमतेइतकेही अर्ज विक्री झालेले नाहीत. अनेक शाळांची बालवाडी प्रवेश क्षमता २०० ते २५० आहे. प्रत्यक्षात ५० ते १०० अर्जांचीच विक्री झाली आहे.
गेल्या काही वर्षांपासून शहरातील पालकांचा ओढा मराठी माध्यमापेक्षा सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमाकडे वाढला आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्याही मराठी माध्यमांच्या तुलनेत वाढली आहे. त्यात घराजवळच्या शाळांना पालकांची अधिक पसंती दिसून येते. आरटीईनुसार २५ टक्के प्रवेशाचा परिणामही दिसून येत आहे. पहिलीला आरटीईनुसार प्रवेश मिळण्याची आशा असल्याने बालवाडीपासूनच पाल्याला पसंतीच्या शाळेत प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल वाढला आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे बालवाडी प्रवेशासाठी रांगा लागल्याचे सांगली, मिरज शहरातील शाळांमध्ये चित्र आता दिसत नाही.काही शाळांतच : सोडतइंग्रजी माध्यमाच्या वाढत्या शाळा याचा विचार करता, यावर्षी २६ शाळांपैकी पाच ते सहा शाळांमध्येच बालवाडी प्रवेशासाठी सोडत होईल, अशी स्थिती आहे. क्षमता व दाखल अर्ज यात मोठी तफावत आहे.मराठी माध्यमशाळा क्षमता अर्जम. के. आठवले २०० १२५बापट बाल शाळा १५० २६२वसंत प्राथमिक १५० १२९बर्वे शाळा १०० ५०देशपांडे शाळा १०० ३३नूतन मराठी १०० १५इंग्रजी माध्यमशाळा क्षमता अर्जइमॅन्युअल १०० ८८अल्फोन्सा १०० १४०आयडीयल ५० ९१एसईएस इंग्लिश ५० ८०कांतिलाल शहा ५० २२
खासगी, विनाअनुदानित शाळांकडे पालकांचा ओढा वाढला आहे. आरटीईच्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचाही परिणाम जाणवत आहे. पहिलीला प्रवेश घेतलेल्या शाळेतच पाल्याला बालवाडीपासून घातले जात आहे. शहरात इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढल्या नसल्या तरी, पूर्वीच्या शाळांमध्ये प्रवेशाकडेही पालकांचा कल वाढला.- हणमंत बिराजदार, प्रशासन अधिकारी, महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ.