लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महानगरपालिका क्षेत्रात पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊन नियमांची महापालिका प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी होणार आहे. ५ मे ते ११ मे या कालावधीत अत्यावश्यक सेवांशिवाय अन्य व्यवहार, व्यवसाय सुरू दिसल्यास सीलच्या कारवाईबरोबर फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात येतील, असा इशारा महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी मंगळवारी दिला.
कापडणीस म्हणाले की, पालकमंत्री जयंत पाटील यांनी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी महापालिका क्षेत्रात सहायक आयुक्तांच्या नेतृत्वाखालील चार पथके सज्ज ठेवली आहेत. बाहेर गावाहून महापालिका क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी केली जाणार आहे. तसेच परगावाहून येणाऱ्या प्रत्येकाला गृह किंवा शासकीय अलगीकरणात ठेवले जाईल. या कालावधीत कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांचीही चाचणी केली जाणार आहे. तसेच शहरात अनावश्यक फिरताना आढळल्यास त्यांची रॅपिड टेस्ट केली जाईल.
महापालिका क्षेत्रात रस्त्यावरील तपासणीसाठी १० आरोग्य केंद्रातील वैद्यकीय पथकेही तयार ठेवण्यात आली आहेत. लॉकडाऊन काळात टेस्टिंगसुद्धा वाढविले जाणार आहे. या काळात अत्यावश्यक सेवा, दूध, मेडिकल या व्यतिरिक्त कोणतीही दुकाने सुरू ठेवता येणार नाहीत. रस्त्यावरून फिरून किंवा होम डिलिव्हरीसुद्धा करता येणार नाही. यावर वॉच ठेवण्यासाठी १० पथकेसुद्धा तैनात केली आहेत. नियमाचे उल्लंघन करताना कोणी आढळून आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. सकाळी किंवा सायंकाळी फिरायला आल्यास त्यांची कोविड चाचणी केली जाईल. अत्यावश्यक दुकाने सोडून अन्य दुकाने उघडी दिसली तर फौजदारी दाखल करणार, असा इशारा त्यांनी दिला.