लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गरीब पूरग्रस्तांच्या घरातील दत्तक घेतलेल्या १ हजार मुलींपैकी पाच मुलींचा प्रातिनिधिक स्वरूपात विवाह सोहळा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ९ सप्टेंबरला कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे करण्यात येणार आहे, अशी माहिती अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या दीपाली सय्यद यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
त्या म्हणाल्या, कसबे डिग्रजमध्ये ९ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता कार्यक्रम होणार आहे. राज्यपालांच्या उपस्थितीत तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑनलाइन सहभागाने हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमास पालकमंत्री जयंत पाटील, भाजपचे नेते व केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार संजयकाका पाटील, शिवसेना नेते नितीन बानुगडे-पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
त्या म्हणाल्या, आमच्या ट्रस्टमार्फत गरीब पूरग्रस्तांच्या घरातील १ हजार मुलींना दत्तक घेऊन त्यांच्या विवाहाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यातील शंभर मुलींचे विवाह केले आहेत. उर्वरित ९०० मुलींपैकी पाच मुलींचे प्रातिनिधिक विवाह कसबे डिग्रजला होणार आहेत. राज्यपालांसह राज्य व केंद्रातील मंत्री, आमदार, खासदार यांच्या उपस्थितीत त्यांच्या डोक्यावर अक्षता पडणार आहेत. याच कार्यक्रमात संबंधित मुलींना प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या ठेवपावतीचे व पासबुकचे वितरणही राज्यपालांच्या हस्ते होईल.
दीपाली सय्यद चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केल्यापासून मदतीचा ओघ सुरू आहे. पूरग्रस्तांच्या घरबांधणीसाठी १० कोटी तर पूरग्रस्तांच्या मुलींच्या विवाहासाठी ५ कोटी अशी १५ कोटींच्या मदतीची तरतूद केली आहे, असे सय्यद यांनी सांगितले.
चौकट
सामाजिक कामामुळे सर्व एकत्र
सामाजिक कार्य असल्याने या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व पक्षांचे नेते एकत्र येत आहेत. राज्यातील राजकारण वेगळे, मात्र समाजासाठी भूमिका वेगळी ठेवायला हवी, याची जाणीव महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांना आहे, असे सय्यद म्हणाल्या.
चौकट
मी राजकारण सोडणार नाही
दीपाली सय्यद म्हणाल्या की, चांगल्या लोकांनी राजकारणात यायला हवे. मागील निवडणूक मी राष्ट्रवादीच्या विरोधात लढविली होती. त्यामुळे यापुढेही मी राजकारण सोडणार नाही; पण समाजकार्यात मला सर्वांची साथ हवी आहे.