सांगली : शेतीतील बेभरवशाच्या उत्पन्नाची जोखीम नको, म्हणून अनेक जण नोकरीला प्राधान्य देतात. तसेच अनेक कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्येचे प्रयत्न केले. कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील सचिन माने यांनी मात्र अभ्यास, ज्ञान घेण्याची आस, कष्ट व पिकांचे नियोजन करण्याची क्लुप्ती यातून शेतीतून चांगल्याप्रकारे उत्पन्न मिळू शकते व कुटुंबाला सुखी-समाधानी ठेवता येते, हे सिध्द केले आहे. माने यांनी कुडची वांग्याच्या पिकातून एकरी वर्षाला आठ ते दहा लाखांचे उत्पन्न मिळवून, तोट्यातील शेती फायदेशीर करुन दाखविली आहे.शेती परवडत नाही, खर्च आणि उत्पन्न याचा मेळ बसत नसल्याच्या नैराश्येतून शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याच्या घटना रोजच आपण पाहतो. पण, शेतीचे योग्य व्यवस्थापन केल्यास काय घडू शकते, हे सचिन माने आणि त्यांच्या वडिलांनी दाखवून दिले आहे. गाव, घर न सोडता आई-वडिलांना आधार देत शेतीच करायची, असे ठरवून वयाच्या तिशीतील सचिन माने कामास लागले. कसबे डिग्रज हे त्यांचे गाव. वडिलोपार्जित त्यांची चार एकर शेती.
वडील पारंपरिक शेती करीत. त्यातून चार-पाच जणांचे कुटुंब गरिबीचे चटके सहन करीत कसेबसे उदरनिर्वाह करीत होते. वडिलोपार्जित चार एकर शेती यशस्वी करुन आज त्यांनी वीस एकर शेती केली आहे. सोळा एकर ऊस, दोन एकरामध्ये हंगामी पिके व उरलेल्या क्षेत्रामध्ये म्हणजे एक ते दोन एकरामध्ये सचिन गेल्या आठ वर्षापासून सलग कुडची वांग्याचे उत्पन्न घेत आहेत. वांगी उत्पादनासाठी खुडची चमकी हे वाण वापरत असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वसाधारणपणे पिकाचा प्लॉट सरासरी चौदा ते पंधरा महिने चालवत आहेत.
सलग चौदा ते पंधरा महिने प्लॉट चालवल्यामुळे तेजी-मंदीचा फारसा फरक पडत नाही. त्यामुळे वर्षाकाठी आठ ते दहा लाखाचे एकरी उत्पन्न मिळत असून, मजुरी, खते, कीटकनाशके आदींसाठी ४० टक्के खर्च होतो. निव्वळ नफा सहा ते सात लाख रुपये गेल्या आठ वर्षांपासून ते मिळवत आहेत.
पहिला वांग्याचा प्लॉट संपायच्या आधी दोन ते तीन महिने दुसºया वांगी प्लॉटची लागण ते करतात. सांगली शहरापासून काही अंतरावर प्लॉट असल्यामुळे नऊ ते दहा किरकोळ व्यापारी जागेवर येऊन स्वत: पॅकिंग करून माल घेऊन जातात.
माने यांचा वाहतुकीचा त्याचप्रमाणे हमाली, तोलाई, कमिशन यासाठी लागणारा खर्च वाचतो. मिळणाºया उत्पन्नातून इतर शेतीचा खर्च भागिवण्यास मदत होते. चार पैसे शिलकीही राहतात. तेजी-मंदीमध्ये जर संयम राखला, तर नक्कीच या वांगी उत्पादनातून फायदा मिळतो.