लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कडक लाॅकडाऊनमधून किराणा साहित्याच्या होलसेल विक्रीला जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली खरी, पण पहिल्याच दिवशी या सवलतीचा फायदा घेत साहित्य खरेदीसाठी मार्केट यार्ड व गणपती पेठेत तोबा गर्दी झाली होती. मास्क, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना हरताळ फासला गेला. या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत पोलीस, महापालिका व बाजार समिती प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने ७ मेपासून कडक लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला. या काळात भाजीपाला, किराणा दुकानेही बंद ठेवण्यात आली. घरपोच सेवाही ठप्प झाली. गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या स्थिरावल्याने जिल्हा प्रशासनाने लाॅकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारपासून सकाळी सात ते अकरा या वेळेत किराणा मालाची होलसेल दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली. या होलसेल व्यापाऱ्यांकडून केवळ किरकोळ विक्रेत्यांनाच माल देण्याच्या सूचना करण्यात आल्या.
पण, प्रत्यक्षात बुधवारी चित्र मात्र वेगळेच होते. मार्केट यार्डात सकाळी सात वाजल्यापासून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यार्डाच्या दक्षिणेकडील केवळ एकच प्रवेशद्वार सुरू ठेवण्यात आले होते. प्रवेशद्वारावर दोन कर्मचारीही तैनात केले होते. पण, खरेदीसाठी झालेली गर्दी या दोघांनाही आवरता आलेली नाही. मार्केट यार्डातील बहुुतांश दुकानांसमोर मोठी गर्दी होती. अनेक जण विनामास्कच होते, तर सोशल डिस्टन्सिंगचा पत्ता नव्हता. किरकोळ दुकानदारासोबत नागरिकांनीही गर्दी केली होती. त्यांनाही किराणा माल देण्यात येत होता. पोलीस व बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती.
गणपती पेठेतही हीच स्थिती होती. बऱ्याच दिवसांनी गणपती पेठेत वाहतुकीची कोंडी झाली होती. या पेठेत २२ व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास परवानगी दिली असली तरी अत्यावश्यक सेवेबाहेरील अनेक दुकाने उघडण्यात आली होती. गणपती पेठेतही खरेदीसाठी तोबा गर्दी झाली होती. महापालिकेच्या पथकानेही कारवाई करण्यात स्वारस्य दाखविले नाही.
चौकट
अत्यावश्यक सेवेबाहेरील दुकाने सुरू
१. मार्केट यार्ड, गणपती पेठेतील किराणा मालाची होलसेल दुकाने सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिली असताना दोन्ही ठिकाणी अत्यावश्यक सेवेबाहेरील दुकानेही सुरू होती. त्यावर कुणाचेच नियंत्रण नव्हते.
२. सकाळी अकरापर्यंतची वेळ असताना दुपारी एक वाजेपर्यंत खरेदी-विक्री सुरू होती.
३. भाजीपाला, फळविक्रेत्यांना परवानगी नसतानाही काही जणांनी रस्त्यावर ठाण मांडले होते. काही विक्रेते हातगाडी घेऊन गल्लीबोळात फिरत होते.
४. शहरात सहायक आयुक्त अशोक कुंभार यांच्या पथकाकडून अकरानंतर दुकाने बंद करण्याची सूचना करण्यात येत होती. पण, त्या सूचनेलाही व्यापाऱ्यांनी केराची टोपली दाखवली होती.