शीतल पाटीलसांगली : पावसाळा तोंडावर येताच महापालिकेकडून आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रात्यक्षिकांना जोर येतो. यंदाही महापालिकेने आपत्तीपूर्व तयारीची प्रात्यक्षिके केली. आता पूरपट्ट्यातील नागरिकांना नोटिसा बजावल्या जात असून कृष्णा नदीचे पाणी पात्राबाहेर पडताच गाठोडे बांधण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. गत दोन महापुराने सांगलीचा नकाशाच बदलला आहे. पण, पूरपट्ट्यातील घरांच्या पुनर्वसनावर पुन्हा चर्चा झडू लागतील, राजकीय टीकाटिप्पणी सुरू होईल, पण प्रश्न ‘जैसे थे’च राहणार आहे.सांगलीत २००५-०६ ला महापुराचा मोठा फटका बसला. पण, महापुरातून शहाणपण न घेता महापालिकेने पूररेषाच बदलण्याची किमया केली. त्यानंतर २०१९ पर्यंत कृष्णा नदीने रौद्ररूप धारण केले नाही. याच काळात पूरपट्ट्यात, अगदी बफर झोनमध्येही घरे झाली. नैसर्गिक नालेही गायब झाले, तर काही नाले अरुंद बनले. नाल्याच्या शेजारीच टोलेजंग इमारतीही उभारल्या गेल्या. २०१९ च्या महापुराने निम्म्याहून अधिक सांगली पाण्याखाली गेली.या महापुरात जीवित आणि वित्त हानी मोठी झाली. कृष्णा नदीने ५७ फुटांपर्यंत पातळी गाठली होती. पुराचा अंदाज न आल्याने लाखो नागरिक घरातच अडकून पडले. त्यानंतर २०२१ मध्ये पुन्हा महापुराने दणका दिला. यावेळीही सव्वा लाखाहून अधिक नागरिकांना स्थलांतर करावे लागले होते.आता पावसाळा तोंडावर आल्याने महापालिकेने आपत्तीपूर्व व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. यांत्रिक बोटी, लाईफ जॅकेट, आपत्ती मित्र अशा विविध यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. पूरपट्ट्यातील नागरिकांना स्थलांतराबाबत नोटिसा बजावल्या जात आहेत. सध्या जामवाडी, मगरमच्छ काॅलनी, काकानगर, दत्तनगर, इनामदार प्लाॅट या परिसरातील नागरिकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.महापुराची शक्यता गृहीत धरून आतापासूनच घरे सोडण्याबाबत नागरिकांची मानसिकता तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. पूर आला तर गाठोडे बांधून घराबाहेर पडा, अशीच सूचना दिली जात आहे. गेल्या वर्ष-दोन वर्षात पूर नियंत्रणासाठी फारशा उपाययोजना केल्या गेलेल्या नाहीत. नाल्यावर मोठी प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. ती हटविलेली नाहीत.
आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिके झाली, आता गाठोडे बांधा...!; सांगलीत पूरपट्ट्यातील नागरिकांना नोटिसा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 5:14 PM