फोटो ओळ : पलूस येथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी मंगळवारी नागरिकांनी गर्दी केली होती.
अशुतोष कस्तुरे
पलूस : पलूस तालुक्यात सध्या कोव्हॅक्सिन लसीचा तुटवडा आहे. ज्यांनी यापूर्वी या लसीचा पहिला डोस घेतला आहे त्यांना ४५ दिवसांनंतरही दुसरा डोस अद्याप मिळाला नाही. यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे.
तालुक्यात १६ जानेवारीपासून आजअखेर ३१७४० कोविशिल्ड लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत. हे सर्व डोस नागरिकांना दिले आहेत. यातुलनेत कोव्हॅक्सिन लसीचे फक्त २०५० डोस आले आहेत. यातून पहिल्या टप्प्यात सर्वांना हे लसीकरण झाले आहे; परंतु ज्यांनी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला त्यांना आता दुसरा डोस उपलब्धतेअभावी मिळेना.
सुरुवातीच्या काळात लसीकरणाला अल्प प्रतिसाद होता; परंतु आता प्रबोधनामुळे लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात आधीच कर्मचारी तुटवडा असल्याने त्यांची धावपळ होत आहे. शिवाय आता १८ ते ४५ वयोगटातील तरुणांचीही ऑनलाइन नोंदणी सुरू केल्याने आरोग्य यंत्रणेवरील भार अजूनच वाढणार आहे. यासाठी शासकीय स्थरावर आणि लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करून तालुक्यात या दोन्ही लसींचा जास्तीत जास्त पुरवठा तालुक्यात करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
कोट
आम्ही कोव्हॅक्सिन लस मागवलेली आहे. दोन दिवसांत ती उपलब्ध होईल. ही लस फक्त दुसऱ्या डोससाठीच असेल. यापुढे ज्या खासगी रुग्णालयात महात्मा फुले योजना कार्यान्वित आहे, त्यांना लस देण्याची परवानगी दिली होती; पण त्यांनाही आता ही लस शासनाकडून मिळणार नाही. त्यांनी ही लस सरळ कंपनीकडून विकत घ्यावी लागणार आहे.
नागरिकांनी घाबरून न जाता सर्वांना लस मिळेल यासाठी आम्ही शासनाकडे वारंवार मागणी पाठवीत आहोत.
-मिलिंद पोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी