इस्लामपूर : सावंतवाडीचे राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी शिवसेना प्रवेशाबाबत माझ्याशी चर्चा केली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांशी बोलून ते निर्णय घेतील, असे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज, रविवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. सेनेत येण्यास इच्छुक असणाऱ्या सर्वांनाच प्रवेश देणे शक्य नाही. मात्र, चांगली कुवत व प्रतिमा असणाऱ्यांचा विचार करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. भाजपला शिवसेनेकडून धोका आहे, अशी वक्तव्ये गृहमंत्री आर. आर. पाटील करीत आहेत. यावर ठाकरे म्हणाले की, हा त्यांच्या गृहखात्याचा तसा रिपोर्ट असेल. आघाडीचा संसार बिघडला आहे. त्यामुळे आमच्या युतीमध्ये काही बेबनाव होतो का? यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. मात्र, विचारांवर आधारित असलेली युती भक्कम आहे. युतीचे कार्यकर्ते निवडणुकीची वाट पहात आहेत. त्यामुळे महायुतीमधील सर्वच घटकांनी आपले पत्ते लवकर उघड करावेत. त्यामुळे निवडणुकीला एकदिलाने व ताकदीने सामोरे जाण्यास मदत होईल.जागा वाटपाची प्रक्रिया आणि त्यासाठीची चर्चा लवकरच होईल. सेनेची उमेदवार यादी तयार आहे. वेळ येताच ती जाहीर करू. विधानसभेची निवडणूक स्वत: लढविणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर ते म्हणाले, अजून निवडणूक तर जाहीर होऊ द्या. सांगली जिल्ह्यात भाजपचे खासदार संजय पाटील यांनी तासगाव—कवठेमहांकाळसाठी अजितराव घोरपडेंची उमेदवारी भाजपतर्फे जाहीर केल्याबाबत ठाकरे म्हणाले, कोणीही उठावे आणि उमेदवार जाहीर करावे, असे होणार नाही. पक्षाच्या चौकटीतच त्यावर चर्चा होऊन योग्य तो निर्णय होईल. सांगली जिल्ह्यातील पाचही जागी शिवसेना उमेदवार देणार आहे. येत्या निवडणुकीत मनसेची अडचण होईल काय? या प्रश्नावर ते म्हणाले, आम्हाला कसली अडचण? त्यांची अडचण त्यांनाच विचारा. (वार्ताहर)
केसरकरांशी प्रवेशाबाबत चर्चा
By admin | Published: July 14, 2014 12:37 AM