काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजित कदमांच्या भाजप प्रवेशाबद्दल चर्चा, कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 03:54 PM2022-09-07T15:54:55+5:302022-09-07T15:59:32+5:30
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात विश्वजित कदम यांना कॅबिनेट मंत्रिपद न देता राज्यमंत्रीपद दिले. यामुळे येथील कार्यकर्त्यांत नाराजी आहे.
प्रताप महाडीक
कडेगाव : काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष व माजी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या भाजप प्रवेशाबाबत पलूस-कडेगाव तालुक्यांमध्ये महिनाभरापासून उलटसुलट चर्चा सुरू आहे. तेव्हापासून कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल आणि उत्सुकता आहे. मागील दोन-तीन दिवसांत पुन्हा या चर्चेने जोर धरला आहे. कदम यांनी मात्र विषयावर बोलण्याचे टाळल्याने त्यांचे मौन ते भाजपच्या वाटेवर असल्याचे संकेत देतेय का, असा तर्क लावला जात आहे.
काही वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वजित कदम यांना ‘लोकमत’च्या एका कार्यक्रमात भाजप प्रवेशाची ‘ऑफर’ दिली होती. त्यावेळी कदम यांनी त्यांना धन्यवाद देऊन आपल्या रक्तात काँग्रेस असल्याचे सांगत भाजपप्रवेशास नकार दिला हाेता. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनीही, कदम भाजपमध्ये आले तर त्यांचे स्वागतच असेल, असे वक्तव्य केले होते.
काँग्रेसचे युवा नेतृत्व म्हणून विश्वजित कदम यांची ओळख आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून त्यांनी प्रभावी कामगिरी केली आहे. मात्र राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर आता काँग्रेसमधील काही नेते आणि आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. कदम यांनीही भाजपची वाट धरली तर पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला मोठे खिंडार पडणार आहे. कदम यांनी भाजपमध्ये जावे आणि जायला नको, असे दोन्ही मतप्रवाह कार्यकर्त्यांमध्ये असले तरी शेवटी कदम हाच आमचा पक्ष, अशी भूमिका याच कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे आता स्वतः विश्वजित कदम काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
कदम समर्थकांमध्ये जुनी खदखद
दिवंगत माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम काँग्रेस आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात सातत्याने राज्याच्या मंत्रिमंडळात होते. त्यांचे नाव अनेकदा मुख्यमंत्री पदासाठी पुढे आले. पण क्षमता असतानाही त्यांना काँग्रेस श्रेष्ठींनी संधी दिली नाही. याशिवाय महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात विश्वजित कदम यांना कॅबिनेट मंत्रिपद न देता राज्यमंत्रीपद दिले. यामुळे येथील कार्यकर्त्यांत नाराजी आहे. यामुळे विश्वजित कदम यांनीच सोयीस्कर निर्णय घ्यावा, असा मतप्रवाह कार्यकर्त्यांमध्ये आहे.