लोकमत न्यूज नटवर्क
इस्लामपूर : कृष्णा साखर कारखान्याच्या रणांगणात ‘इस्लामपूर पॅटर्न’ चर्चेत आहे. तिन्ही गटांच्या नेत्यांची येथे उमेदवार चाचपणी संपली असून, तिन्ही पॅनलकडून उमेदवार निश्चित झाले आहेत. रयत आणि संस्थापक पॅनल यांचे मनोमिलन झाल्यास इस्लामपुरातील एकच उमेदवार निश्चित केला जाणार आहे.
माजी सहकारमंत्री दिवंगत यशवंतराव मोहिते यांच्या मार्गदशनाखाली कृष्णा सहकारी साखर कारखान्यात त्यांचे बंधू दिवंगत जयवंतराव भोसले यांचे नेतृत्व उदयास आले, तेव्हापासून त्या दोघांचे उरुण परिसराशी स्नेहाचे नाते होते. त्याकाळी बापू कृष्णा खांबे हे इस्लामपुरातील एकमेव संचालक होते. त्यानंतर दिवंगत एम. डी. पवार यांच्या घरातील अशोक महादेव पवार हे भोसले गटातून संचालक होते, तर रयत पॅनलकडून माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांची वर्णी लागली. दहा वर्षांपूर्वी अविनाश मोहिते यांच्या रूपाने संस्थापक पॅनलचा उदय होऊन तिरंगी लढती झाल्या. यामध्ये इस्लामपुरातून माधवराव पाटील निवडून आले. मागील निवडणुकीत सहकार पॅनलचे संजय पाटील आणि संस्थापक पॅनलचे युवराज पाटील यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली. त्यात संजय पाटील यांनी बाजी मारली.
सध्या तिन्ही पॅनलच्या नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश दिले आहेत. पहिल्या टप्प्यात संस्थापक पॅनलकडून माजी नगरसेवक शिवाजी पवार यांनी अर्ज भरला आहे, तर याच पॅनलकडून युवराज पाटीलही अर्ज भरणार आहेत.
रयत पॅनलकडून माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक आनंदराव मलगुंडे शुक्रवारी (दि. २८) अर्ज दाखल करणार आहेत. सहकार पॅनलकडे भाऊगर्दी असली, तरी विद्यमान संचालक संजय पाटील यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील हेही अपक्ष म्हणून अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत. शिवाजी पवार वगळता उर्वरित सर्वजण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे समर्थक असल्याने या निवडणुकीत उमेदवारांना स्वत:ची ताकद दाखवावी लागणार आहे.