जयवंत आदाटे ल्ल जतआगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जत तालुक्यातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. आमदार विलासराव जगताप यांनी रामपूर येथे जनसुराज्य पक्षाचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील आणि बाजार समिती माजी सभापती सुरेश शिंदे यांच्याशी आघाडीबाबत चर्चा केली आहे. यामुळे ऐन थंडीत तालुक्यातील वातावरण तापले आहे.जत तालुक्यात जिल्हा परिषदेचे नऊ व पंचायत समितीचे अठरा मतदार संघ आहेत. सर्वसाधारण मतदार संघातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत, तर इतर मतदार संघातील हालचाली थंड आहेत. परंतु उमेदवारी कोणाला मिळणार व बंडखोरी कोण करणार आणि कोणत्या पक्षाची युती कोणाबरोबर होणार, याबद्दल चर्चा सुरू आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती करण्यासंदर्भात आमदार विलासराव जगताप यांनी रामपूर (ता. जत) येथे जनसुराज्य पक्षाचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील आणि बाजार समिती माजी सभापती सुरेश शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे. शिंदे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना एका गटात व दोन गणात उमेदवारी आणि बसवराज पाटील समर्थक कार्यकर्त्यांना एका गटात उमेदवारी देण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाल्याचे समजते. यासंदर्भात विलासराव जगताप यांच्याशी संपर्क साधला असता, आम्ही एकत्रित प्राथमिक चर्चा केली आहे. परंतु उमेदवारी देण्यासंदर्भात कोणताही अंतिम निर्णय झाला नाही. याबाबत आणखी एक-दोन बैठका झाल्यानंतर यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.आठ दिवसांपूर्वी भाजपचे जिल्हा नेते व पश्चिम महाराष्ट्र समन्वय समितीचे अध्यक्ष मकरंद देशपांडे जत तालुक्यात आले होते. त्यांनी बसवराज पाटील यांच्याशी युती करण्यासंदर्भात त्यावेळी चर्चा केली होती. त्यानुसार बसवराज पाटील भाजपसोबत युती करण्यासाठी सहमत झाले आहेत, अशीही चर्चा आहे. वास्तविक जनसुराज्य शक्ती पक्ष राज्यपातळीवर भाजपसोबतच आहे.काँग्रेससाठी तालुक्यात पोषक वातावरण आहे. पक्षात राहून गट-तट निर्माण करणाऱ्यांना आम्ही थारा देणार नाही. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसप्रेमी कोण आणि गद्दार कोण आहे ते समजून येणार आहे. पक्षात राहून प्रामाणिक काम करणाऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. कठीण काळातही त्यांच्या पाठीशी ठाम राहू, असे मत जिल्हा बँकेचे संचालक विक्रम सावंत यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना व्यक्त केले.कॉँग्रेस गटबाजीत : गोपनीय बैठकानिवडणूक जाहीर झाली तरीही कॉँग्रेसमध्ये अद्याप एकवाक्यता दिसत नाही. आम्ही सध्या काँग्रेस पक्षातच आहोत, पक्ष सोडणार नाही. काँग्रेसकडून आम्हाला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पन्नास टक्के जागा मिळाल्या पाहिजेत. याशिवाय एबी फॉर्म प्रथम आमच्या हातात दिला पाहिजे, अशी मागणी सुरेश शिंदे यांनी एकीकडे सुरू ठेवून दुसरीकडे भाजपसोबत युती करण्यासाठी गोपनीय बोलणी आणि बैठक घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांचा निर्णय गुलदस्त्यात आहे.
नव्या राजकीय समीकरणांची चर्चा
By admin | Published: January 15, 2017 11:38 PM