सांगली : पालकमंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शासनाकडून कोट्यवधी निधी आणत आहे. त्यात इतर पक्षांच्या नगरसेवकांना फारच कमी वाटा मिळतो. त्यामुळे आता काँग्रेसचे नेतेही शासन निधीसाठी सरसावले आहेत. बुधवारी जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील यांनी अर्थमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली. काँग्रेस नगरसेवकांच्या वाॅर्डातील विकासकामांसाठी दहा कोटी रुपयांच्या निधीची मागणीही त्यांनी केली आहे.महापालिकेतील सर्वांत छोटा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे महापौरपद आहे. या पदाचा पुरेपूर वापर राष्ट्रवादीकडून केला जात आहे. त्यात जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे असल्याने त्यांची साथ मिळत आहे.
त्यामुळे राज्य शासन, जिल्हा नियोजन समितीतून महापालिका क्षेत्रातील विकासकामांना कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त होत आहे; पण निधीत राष्ट्रवादीचा हिस्सा अधिक असतो. काँग्रेस-राष्ट्रवादीची एकत्र सत्ता असली तरी काँग्रेसला फारसे विश्वासात घेतले जात नाही. भाजप तर विरोधक म्हणून फारच दूर आहे. त्यामुळे काँग्रेस नगरसेवकांत अस्वस्थता होती.जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी काँग्रेस नगरसेवकांकडून त्यांच्या वाॅर्डातील कामांची यादी मागविली. प्रत्येक नगरसेवकाला किमान ५० लाखांपर्यंतचा निधी शासनाकडून मिळावा, असे नियोजन करण्यात आले आहे. कामांच्या यादीसह सोमवारी मुंबईत श्रीमती पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. हौसिंग फायनान्स फेडरेशनच्या बैठकीच्या निमित्ताने ही भेट झाली. या भेटीत श्रीमती पाटील यांनी पवार यांच्याकडे दहा कोटींच्या निधीची मागणी केली आहे. तसे पत्रही देण्यात आले.मध्यंतरी श्रीमती पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा रंगली होती; पण कालांतराने ही चर्चा थंडावली. आता मुंबईत पवार यांच्या भेटीनंतर पुन्हा जिल्ह्यात पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा रंगली होती. पण काँग्रेस पदाधिकारी व नगरसेवकांनी विकासकामांच्या निधीसाठी ही भेट असून पक्षप्रवेशावर कसलीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले.दादांकडून आश्वासनकाँग्रेसचे २० नगरसेवक आहेत. या नगरसेवकांच्या त्यांच्या वॉर्डातील कामासाठी निधीची मागणी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली. पवार यांनीही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करुन लवकरच निधीबाबत निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.