सांगली : सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी केलेले कौतुक, विरोधकांकडून त्रुटींवर ठेवलेले बोट, सूचना व अभ्यासाचा अभाव अशा वातावरणात बुधवारी तब्बल साडेपाच तास महापालिकेच्या अर्थसंकल्पावर चर्चेचे गुºहाळ रंगले होते. सत्ताधाऱ्यांनी हा अर्थसंकल्प तीनही शहरांच्या विकासाला न्याय देणारा असल्याचा दावा केला, तर विरोधकांनी गुंठेवारी, आरोग्य विभागातील समस्या मांडत टीका केली. गुंठेवारीत चालता येत नाही, सांडपाण्याचा निचरा होत नाही, त्यासाठी तरतूद नाही. मात्र स्वागत कमानीला तरतूद आहे. हा सर्वसामान्यांच्या जगण्यासाठीचा अर्थसंकल्प नाही, असा आरोप केला. अखेर सदस्यांच्या सूचना विचारात घेऊन चांगला अर्थसंकल्प देऊ, अशी ग्वाही देत महापौर संगीता खोत यांनी चर्चेला पूर्णविराम दिला.
स्थायी समितीचे सभापती अजिंक्य पाटील यांनी गेल्या शनिवारी महासभेत ७६७ कोटींचा अर्थसंकल्प महापौर संगीता खोत यांच्याकडे सादर केला होता. त्यावर चर्चा करण्यासाठी बुधवारी सभेचे आयोजन करण्यात आले होते. अर्थसंकल्पावरील चर्चेत तब्बल तीस नगरसेवकांनी भाग घेतला.
भाजपच्या सत्तेतील हा पहिलाच अर्थसंकल्प होता. त्यामुळे सर्वच सत्ताधारी सदस्यांनी अंदाजपत्रकातील तरतुदींचा उल्लेख करीत या अर्थसंकल्पाचे कौतुक केले. काही मोजके सदस्य वगळता, इतरांनी सूचनांकडे दुर्लक्ष केले. केवळ अर्थसंकल्प कसा चांगला आहे, त्यातील तरतुदी काय आहेत, हे सांगताना नेत्यांवर कौतुकाचा वर्षाव केला, तर विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांतही अभ्यासाचा अभाव दिसून आला. काही सदस्यांनी मात्र अर्थसंकल्पातील त्रुटींवर बोट ठेवून सत्ताधाºयांना घेरण्याचा प्रयत्न केला.
भारती दिगडे यांनी जनतेवर अन्याय न करणारा अर्थसंकल्प असून, नगरसेवकांंना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रभाग समित्या सक्षम करण्यासाठी आठ कोटींची तरतूद केली आहे. कोणतीही करवाढ केलेली नाही, असा दावा केला. लक्ष्मण नवलाई, अनारकली कुरणे, स्वाती शिंदे, सविता मदने, गजानन मगदूम, विजय घाडगे, राजेंद्र कुंभार या सदस्यांनीही त्याची री ओढली. घाडगे यांनी कुपवाड ड्रेनेज व मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न उपस्थित केला, तर कुंभार यांनी महात्मा बसवेश्वर पुतळ्यासाठी निधीची मागणी केली.
काँग्रेसचे अभिजित भोसले यांनी गुंठेवारीतील समस्यांचा पाढाच वाचला. गुंठेवारीत चालता येत नाही, ड्रेनेज नाही, सांडपाण्याचा निचरा होत नाही, त्याला तरतूद नाही. मात्र शहरात स्वागत कमानी उभारणे, दिशादर्शक फलक उभारण्यासाठी निधी दिला आहे. हा अर्थसंकल्प गुंठेवारी, विस्तारित भागातील लोकांसाठी नाही. यात त्यांच्या जगण्याची तरतूद केलेली नाही. त्यामुळे डीपीआर करुन निधीची तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी केली.
राष्ट्रवादीचे योगेंद्र थोरात यांनीही गुंठेवारी, अनुसूचित जाती, जमाती व विस्तारित भागासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी केली. नगरसेविका संगीता हारगे यांनी, बायनेम कामे वगळल्याने अडचणी निर्माण होणार आहेत. विशिष्ट ठिकाणी कामे होणार नाहीत, निधी पळवला जाईल, अशी भीती व्यक्त केली.
नगरसेवक संतोष पाटील यांनी शहरातील नाल्यांसाठी तरतूद करण्याची गरज असल्याचे सांगितले. एलबीटीचे १६८ कोटी, घरपट्टीचे ३५ कोटी व मालमत्तेचे पाच कोटी थकीत आहेत, ते उडवावेत. महापालिकेचे उत्पन्न फक्त २५९ कोटी आहे. त्यातील १७० कोटी पगारावर जातात. उर्वरित उत्पन्नावर महापालिका चालवणे अवघड आहे. त्यासाठी उत्पन्न वाढवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी, प्रशासनाला उत्पन्न व खर्चाचा ताळमेळच लागलेला नाही. आयुक्तांनी तशी टीप दिली आहे. त्यामागे काही गौडबंगाल आहे का? अशी शंका व्यक्त केली. अर्थसंकल्पातील तरतुदी पाहिल्या, तर ३० ते ३५ कोटी रुपयांची तूट येणार आहे. अमृत योजनेचे २४ कोटी देणे असताना ३२ कोटीची तरतूद केली आहे. घनकचरा व्यवस्थापनचे ४२ कोटी पडून आहेत. गेल्या काही महिन्यात सत्ताधाºयांचीच कामे जास्त झाली आहेत.
त्यामुळे सर्वांना समान न्याय दिल्याचा दावा चुकीचा आहे. बायनेम निधी नसल्याने निधी पळविण्याचे प्रकार होतील, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.दुजाभाव करणार नाही : शेखर इनामदारभाजपचे नेते शेखर इनामदार म्हणाले, स्थायी समितीने वस्तुनिष्ठ अर्थसंकल्प मांडला आहे. बायनेम कामे नसली, तरी निधी पळवला जाणार नाही. गुंठेवारीसाठी निधी दिला जाईल. दुजाभाव करणार नाही. विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे. मुख्यमंत्र्यांनी आणखी निधी देण्याची ग्वाही दिली आहे. सामाजिक न्यायमधूनही २५-३० कोटींचा निधी आणून कामे करु. उत्पन्न वाढीसाठी स्वतंत्र बैठक घेऊ. महापालिकेचा स्वतंत्र पेट्रोल पंप तसेच मल्टिपर्पज कार्यालय उभारुन उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
कोण, काय म्हणाले...वहिदा नायकवडी : शहरी बस सेवा ताब्यात घेतल्यास उत्पन्न मिळू शकेल. रुग्णालयांची नोंदणीही कमी आहे, ती केल्यास उत्पन्नात भर पडेल.शेडजी मोहिते : नाले बांधण्यासाठी तरतूद करावी. भाजी मंडईसाठी पाच कोटींची तरतूद करावी.स्वाती शिंदे : साहित्यिक अण्णा भाऊ साठेंच्या पुतळ्यासाठी तरतूद करावी, स्टेशन रोडवरील गटार, चेंबर दुरुस्तीसाठी तरतूद करावी. छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या तरतुदीत वाढ करावी.मैनुद्दीन बागवान : सर्व समाजाच्या स्मशानभूमीसाठी तरतूद करावी.संजय मेंढे : नाममात्र भाड्याने दिलेल्या मालमत्तांत पोटभाडेकरू आहेत. अशा मालमत्ता ताब्यात घेऊन नव्याने लिलाव काढावा.करण जामदार : कृष्णाघाट स्मशानभूमीसाठी निधी द्यावा. वैरण बाजारातील समस्या सोडवाव्यात.राजेंद्र कुंभार : कुपवाडला मंडई, सांगली व मिरजेत महात्मा बसवेश्वर पुतळयासाठी तरतूद करावी.