लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : तालुक्यातील मल्लेवाडी येथे द्राक्षबागेत औषध फवारणी केल्यानंतर अस्वस्थ झाल्याने दादासाहेब तात्यासाहेब चौगुले (वय ३८) या शेतकºयाचा मृत्यू झाला. कीटकनाशक फवारणीमुळे शेतकºयाच्या मृत्यूच्या घटनेमुळे कृषी अधिकाºयांनी शासकीय रूग्णालयात धाव घेतली. मात्र चौगुले यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
दादासाहेब चौगुले यांची मल्लेवाडीतील महावीरनगर येथे दीड एकर द्राक्षबाग आहे. पंधरा दिवसापूर्वी त्यांनी बागेची छाटणी केली असून शुक्रवारी सकाळी त्यांनी बागेत लिओसिन या औषधाची फवारणी केली. औषध फवारणीनंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी घरात विश्रांती घेतली. मात्र प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना दुपारी मिरजेच्या शासकीय रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
कीटनाशक फवारणीनंतर शेतकºयाचा मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच मल्लेवाडी परिसरातील शेतकºयांची रूग्णालयात गर्दी झाली होती. मंडल कृषी अधिकारी एन. एस. मेंढे यांनीही रूग्णालयात भेट देऊन पाहणी केली.मात्र शवविच्छेदनात चौगुले यांच्या मृत्यूचे निश्चित कारण समजले नसल्याने व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. याबाबत ग्रामीण पोलिसात नोंद आहे. मृत दादासाहेब चौगुले यांच्या पश्चात वृध्द वडील, पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.यवतमाळच्या घटनेची आठवणयवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकामुळे अनेक शेतकºयांचा मृत्यू झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मल्लेवाडी येथील दादासाहेब चौगुले यांच्या आकस्मिक मृत्यूने खळबळ उडाली आहे. तालुका कृषी अधिकारी हणमंत मेडीदार यांनी, चौगुले यांनी फवारणी केलेले लिओसिन हे औषध कीटकनाशक नाही, तसेच या औषधाच्या फवारणीमुळे मृत्यू होत नाही, असे सांगितले. चौगुले हे अनुभवी द्राक्ष बागायतदार होते. कीटकनाशकाचा वापर कसा करायचा, हे त्यांना माहिती होते. विदर्भातील घटनेप्रमाणे येथे असा प्रकार घडला नसावा, असेही मेडीदार यांनी सांगितले. कृषी विभागाचे अधिकारी मल्लेवाडी येथे जाऊन चौगुले यांच्या द्राक्ष बागेची पाहणी करणार आहेत.