सांगलीची काँग्रेस बरखास्त करून मला पाठिंबा द्या; प्रकाश शेंडगे यांचा प्रतीक पाटील यांच्याकडे प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 05:10 PM2024-04-12T17:10:29+5:302024-04-12T17:12:02+5:30
'आज पुन्हा वसंतदादांच्या विकासाचा रथ चालवयाचा असेल, तर शेंडगे व वसंतदादा घराण्याला एकत्र यावे लागेल'
सांगली : जत तालुका काँग्रेस बरखास्त करून २००९ मध्ये मला पाठिंबा दिला आणि २१ दिवसांत मी आमदार झालो. आता सांगली लोकसभा मतदारसंघात ती वेळ आली आहे. जिल्हा काँग्रेस बरखास्त करून मला पाठिंबा दिला, तर वसंतदादांचा विचार रुजवायला मदत होईल, अशी भूमिका ओबीसी आघाडीचे नेते व माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी गुरुवारी मांडली.
वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगलीत प्रकाश शेंडगे यांना पाठिंबा दिला आहे. आता विशाल पाटील यांच्यासाठी प्रतीक पाटील यांनी आंबेडकर यांना गळ घातली आहे. त्यांनी आधी शेंडगे यांच्याशी भेटून समजूत काढा, अशी सूचना काँग्रेस नेत्यांना केली. त्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी शेंडगे यांची मुंबई येथे भेट घेतली. त्यांना पाठिंब्यासाठी आवाहन केले. त्यानंतर शेंडगे यांनी आपली भूमिका मांडली.
ते म्हणाले, ‘सांगली लोकसभा मतदारसंघातील आजची काँग्रेसची अवस्था ही २००९ ला जतमध्ये झाली होती तशीच आहे. त्यावेळी ‘जत पॅटर्न’ राबवला होता. आता पुन्हा एकदा तो पॅटर्न राबवावा, अशी भूमिका अनेक काँग्रेस कार्यकर्ते मांडत आहेत. मला भाजपची उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी काँग्रेस बरखास्त करून माझ्या पाठीशी सर्वजण उभे राहिले होते. त्यानंतर पुन्हा काँग्रेस उभा करण्याचे काम मी केले. आज काँग्रेसचा तेथे आमदार आहे. लोकसभेत काँग्रेसची तीच अवस्था आहे. वसंतदादा पाटील यांच्या विचारांची काँग्रेस टिकवायची असेल तर त्या पॅटर्नची पुनरावृत्ती करावी लागेल.
वसंतदादांची कॉंग्रेस संपवायची आहे..
जिल्ह्यातील काही नेत्यांना वसंतदादांची काँग्रेस संपवायची आहे. आमचे वडील शिवाजीबापू शेंडगे हे वसंतदादांच्या तालमीत तयार झाले. आज पुन्हा वसंतदादांच्या विकासाचा रथ चालवयाचा असेल, तर शेंडगे व वसंतदादा घराण्याला एकत्र यावे लागेल. सांगलीत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोणतीही लाट नाही. तसेच, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मला याआधी पाठिंबा जाहीर केलेला आहे. ते ‘शब्द’ मागे घेणार नाहीत, यावर माझा विश्वास असल्याचे शेडगे यांनी सांगितले.