सांगली : अनियमितता, नियमबाह्य कामे, गैरव्यवहार आदी कारणांवरून बरखास्त करण्यात आलेले सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ निवडणुकीस पात्र असल्याचा निर्णय बुधवारी उच्च न्यायालयाने दिला. निवडणुकीसाठी पात्र ठरविण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका बरखास्त संचालक मंडळातील चौदा जणांनी दाखल केली होती. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ राज्य शासनाने १५ जानेवारी २०१३ रोजी बरखास्त केले होते. बाजार समितीच्या व्यवहारांमधील अनियमितता, नियमबाह्य कामे, कायद्यानुसार कामांचा अभाव आदी कारणांवरून संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले होते. त्यानंतर बाजार समितीवर प्रशासक म्हणून प्रभाकर माळी यांची नियुक्ती करण्यात आली होती. बरखास्त करण्यात आलेले संचालक मंडळ निवडणुकीस अपात्र ठरणार असल्यामुळे सभापती वैभव पाटील यांच्यासह चौदा जणांनी शासनाच्या बरखास्तीच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्याचबरोबर बाजार समितीच्या आगामी निवडणुकीसाठी अपात्र ठरवू नये, अशी याचिका दाखल केली होती. याबाबत बुधवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. बरखास्त झालेले संचालक मंडळ निवडणुकीसाठी अपात्र ठरू शकत नाही. याची सूचना सरकारी वकिलांनी राज्य शासनाला द्यावी, असा निकाल न्यायालयाने दिला. न्यायालयाचा निकाल येताच बरखास्त संचालक मंडळाचे सदस्य बाळासाहेब बंडगर व त्यांच्या समर्थकांनी मार्केट यार्डमध्ये फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. गेल्या सहा महिन्यांपासून बरखास्त संचालकांवर अपात्रतेची टांगती तलवार होती. या निर्णयाने त्यातील इच्छुकांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)यांना मिळाला दिलासाएकीकडे निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना, दुसरीकडे निवडणुकीस अपात्र ठरविण्याची भीती बरखास्त संचालकांना होती. न्यायालयाच्या बुधवारच्या निर्णयाने मदन पाटील, भारत डुबुले, प्रकाश जमदाडे, राजेंद्र कुंभार, संभाजी पाटील, भारत कुंडले, महादेव अंकलगी, विश्वनाथ कोळेकर, वैभव पाटील, संगीता नलवडे, भाग्यश्री पवार, संजय सावंत, जयदेव मळकुटगी, बाळासाहेब बंडगर आदींना दिलासा मिळाला आहे. यामधील वैभव पाटील,भाग्यश्री पवार, संगीता नलवडे, विश्वनाथ कोळेकर, संजय सावंत हे आता बाजार समितीचे सभासद नाहीत.
बरखास्त संचालक निवडणुकीस पात्र
By admin | Published: July 02, 2015 12:19 AM