दिलीप मोहिते
विटा : जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांचा चालू गळीत हंगाम अर्धा संपत आला तरी खानापूर तालुक्यातील नागेवाडीच्या यशवंत साखर कारखान्याचा बॉयलर या हंगामात पेटला नाही. पण गेल्या ९ वर्षांपासून न्यायालयीन लढाईत अडकलेल्या ‘यशवंत’च्या राजकीय संघर्षाची धुराडी मात्र यंदा पेटली आहे. खासदार संजय पाटील व आमदार अनिल बाबर हे दोघे मित्र आमने-सामने आले आहेत.
नागेवाडीचा यशवंत साखर कारखाना कर्जबाजारी झाल्यानंतर कर्जाची परतफेड झाली नाही. त्यामुळे हा कारखाना जिल्हा बँकेने ताब्यात घेतला. त्या वेळी आमदार बाबर यांनी कर्जाचे पुनर्वसन व हप्ते पाडून घेण्यासाठी प्रयत्न केला. परंतु तो यशस्वी झाला नाही. परिणामी, बँकेने कारखाना लिलावात काढला. त्या वेळी हा साखर कारखाना खासदार संजय पाटील यांच्या गणपती जिल्हा संघाने ५६ कोटी ५१ हजार रुपयांना खरेदी केला.
त्यानंतर आमदार अनिल बाबर यांनी या प्रक्रियेस थेट न्यायालयात आव्हान देऊन यशवंत साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा राहावा, यासाठी न्यायालयीन लढाई सुरू केली. सन २०१२-१३ मध्ये सुरू झालेली ही लढाई या वर्षी संपुष्टात आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ९ वर्षांनंतर या कारखान्याबाबतचा खासदार व आमदार संघर्ष उफाळून आला.
खासदार पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार बाबर यांना कुरघोडीचे राजकारण बंद करा, नाहीतर तुमचा सर्व कारभार समाजापुढे आणतो, असा इशारा दिल्यानंतर आमदार बाबर यांनी हा कारखाना सभासदांच्या मालकीचा होईपर्यंत मी लढत राहणार असून धमक्यांना घाबरत नाही, तुम्ही सांगाल तिथे एकटाच येतो, असे सांगून खासदारांना प्रतिआव्हान दिले.
राजकारणात व निवडणुका एकमेकांना मदत करणारे व एकमेकांचे गुणगान गाणारे हे दोन राजकीय मित्र ‘यशवंत’मुळे आमने-सामने आले आहेत. त्यामुळे गेल्या गळीत हंगामातील शेतकऱ्यांच्या ऊसबिलाची थकबाकी असल्याने या वर्षीच्या गळीत हंगामात कारखान्याच्या गव्हाणीत उसाची कांडी न पडल्याने चालू वर्षी बंद असलेल्या यशवंत कारखान्यात अनुत्पादित झालेली साखर खासदार व आमदारांच्या संघर्षामुळे कडू झाली आहे.
आव्हान - प्रतिआव्हानांनी राजकारण तापलेखासदार पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून आमदार बाबर यांना कुरघोडीचे राजकारण बंद करा, नाहीतर तुमचा सर्व कारभार समाजापुढे आणतो, असा इशारा दिल्यानंतर आमदार बाबर यांनी हा कारखाना सभासदांच्या मालकीचा होईपर्यंत मी लढत राहणार असून धमक्यांना घाबरत नाही, तुम्ही सांगाल तिथे एकटाच येतो, असे सांगून खासदारांना प्रतिआव्हान दिले.