इस्लामपूर : इस्लामपूर पालिका सभेत आज पुन्हा एकदा सत्तारूढ विकास आघाडी आणि विरोधी राष्ट्रवादीमध्ये वादंग माजले. भुयारी गटार काम सुरू झालेच पाहिजे अशी घोषणाबाजी सत्तारूढ सदस्यांनी केली. त्याला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीने भुयारी गटारचे काम न करणाऱ्यांचा धिक्कार असो अशी घोषणाबाजी केल्याने तणाव निर्माण झाला. या तणावामुळे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी १० मिनिटांसाठी सभेचे कामकाज तहकूब केले.सभेच्या सुरुवातीलाच विक्रम पाटील यांनी भुयारी गटार काम सुरू करण्यासाठी शासनाची कोणतीही स्थगिती नसताना हे काम सुरू का होत नाही? या कामात कोण अडथळा आणत आहे, त्याचा सोक्षमोक्ष लावा अशी मागणी केली. त्यावर संजय कोरे यांनी नगराध्यक्ष पाटील यांच्याकडे पत्र दिले. आमचा विरोध कुठेही नाही. सभेचे कामकाज नियमाप्रमाणे सुरू करा अशी मागणी केली. चिमन डांगे यांनी मुख्य विषयाला सुरुवात करण्याची मागणी केली.यावर आक्रमक झालेल्या सत्तारूढ गटाच्या शकील सय्यद, वैभव पवार, अमित ओसवाल, चेतन शिंदे, प्रदीप लोहार या सदस्यांनी भुयारी गटाराचे काम सुरू करण्याचा ठेका धरत घोषणाबाजी केली. त्याला काम सुरू न करणाऱ्यांचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या. या योजनेच्या कामावरून एकमेकांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न आजच्या सभेत सुरू होता.
इस्लामपूर पालिका सभेत भुयारी गटारीवरून जोरदार घोषणाबाजी, काही काळ सभा तहकूब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2021 1:47 PM