शिराळा : नवीन वर्षारंभीच अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वादामुळे एसटी बससेवा बंद राहण्याचा प्रकार शिराळा आगारात शुक्रवारी घडला. यामुळे विद्यार्थी, महिला, नोकरदार, वयोवृद्धांना त्रास झाला. दि. ३१ डिसेंबररोजी सायंकाळी सातच्या सुमारास येथील मिनी बसच्या चालक-वाहकांनी डबल ड्युटी केली होती. ते दुपारी जेवलेही नव्हते. मात्र त्यांची गाडी ब्रेकडाऊन झाल्याने अर्धा तास उशीर झाला. परिणामी इस्लामपूरला फेरी जमणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. मात्र आगारप्रमुख जी. डी. पाटील यांनी या कर्मचाऱ्यांना प्रवाशांसमोर अर्वाच्य भाषेत बोल सुनावले. यावेळी मध्यस्थी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनाही त्यांनी सुनावले. शुक्रवारी सकाळपासून एसटी चालक, वाहकांनी नियमानुसार काम व व्यवस्थित गाडी असेल तरच ताब्यात घ्यायची, असा पवित्रा घेतला. त्यातून सर्वच गाड्या ताब्यात घेण्यास नकार दिला. अनेक फेऱ्या रद्द झाल्या. हा बंद अचानक झाल्याने प्रवाशांना त्रास सोसावा लागला. याबाबत संघटनेचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांगितले की, शिराळा आगाराकडे १४३ वाहक आहेत. त्यापैकी दोघे येथे नाहीत. एक मृत झाला आहे, पाच महिला वाहक बाळंतपणाच्या रजेवर, तीन वाहक नियंत्रण कक्षाकडे आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना डबल ड्युटी करावी लागते. ते उपाशीपोटी काम करतात. गेल्या तीन वर्षात फक्त चार नव्या गाड्या आल्या आहेत. त्या आठ लाख किलोमीटरपेक्षा जास्त फिरल्या आहेत. त्यामुळे दुरुस्तीचे प्रमाण वाढले आहे. आगारातून जाणारी गाडी परत सुरक्षित येईलच याची खात्री नाही. प्रादेशिक परिवहन विभागाने दोन वाहनांवर कारवाई केली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना दंडही भरावा लागला आहे.आगार प्रमुखांचा कर्मचाऱ्यांवर विश्वास नाही. (वार्ताहर)तोडगा निघाल्याने कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागेदुपारी दोन वाजता विभागीय वाहतूक अधीक्षक घन:श्याम पाटील, यंत्र अभियंता ए. एम. वाघाटे, कामगार अधिकारी सौ. व्ही. एस. डांगरे, इस्लामपूर आगारप्रमुख बी. व्ही. कदम यांनी आगारामध्ये अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेऊन, कर्मचारी वर्गाच्या तक्रारी, मागण्या ऐकून घेतल्या. अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत अपेक्षा जाणून घेतल्या. याबाबत तोडगा काढल्यानंतर दुपारी तीन वाजता हे आंदोलन मागे घेण्यात आले.संबंधित वाहक-चालकांना आम्ही सांगितले की, ड्युटी अर्धवट सोडता येणार नाही. फेरी रद्द करू नका. ही फेरी इस्लामपूर जलद असून जाण्या-येण्यास ५० मिनिटे लागतील. ही फेरी रद्द केली, तर तुमच्या पगाराचे नुकसान होईल. मात्र या सांगण्याचा विपर्यास करून हा प्रकार घडला आहे. - जी. डी. पाटील, आगारप्रमुख, शिराळा
आगारातील वादात शिराळ्यात एसटी बंद
By admin | Published: January 01, 2016 11:27 PM