सांगली : जिल्हा बॅँकेतील महत्त्वाच्या चार अधिकाऱ्यांच्या चार वर्षांपूर्वी झालेल्या पदोन्नतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत सहा संचालकांनी शनिवारी मंडळाच्या बैठकीतच अधिकाऱ्यांना हटविण्याचा मनसुबा व्यक्त केला. अधिकाऱ्यांना पदावरून हटविण्याची मागणी बॅँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी फेटाळून लावली. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत शनिवारी संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा बँकेचे प्रभारी कार्यकारी संचालक बी. एम. रामदुर्ग, व्यवस्थापक मानसिंग पाटील, जे. जे. पाटील आणि सुधीर काटे या चार अधिकाऱ्यांची पदोन्नती बेकायदेशीर असल्याचे सांगत सहा संचालकांनी त्यांना पदावरून हटविण्याची मागणी केली. संचालक मंडळ बरखास्त होण्यापूर्वी तत्कालीन कार्यकारी संचालक जयवंत कडू-पाटील यांनी या चारही अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेऊन पदोन्नतीची शिफारस केली होती. त्यानंतर संचालक मंडळ बरखास्त झाले. प्रशासक शैलेश कोतमिरे यांनी या चारही अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाचे मूल्यमापन करून पदोन्नती दिली होती. त्यानंतर कर्मचारी संघटनेने याविरोधात न्यायालयात तक्रार केली होती. याप्रकरणी कोणतीही स्थगिती नाही. या सर्व गोष्टींची माहिती घेऊन (अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी संचालकांची मागणी फेटाळली. त्यामुळेच सहा संचालक संतप्त बनले. त्यांनी अध्यक्षांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संचालक मंडळातील वादावादीचा हा प्रकार अधिकाऱ्यांसमोर झाला. त्यामुळे अधिकाऱ्यांनाही अचानक झालेल्या या मागणीने धक्का बसला. अध्यक्षांनी मागणीकडे दुर्लक्ष केल्याने काही संचालक जयंत पाटील यांची भेट घेऊन याबाबतची मागणी करणार असल्याचे समजते. (प्रतिनिधी)घोटाळ््यामुळे वादप्रशासकीय काळात या अधिकाऱ्यांनी चौकशी अधिकाऱ्यांना सर्व माहिती पुरविल्यामुळे काही संचालकांचा या अधिकाऱ्यांवर राग असल्याची चर्चा जुनी आहे. शनिवारी मंडळाच्या बैठकीत झालेल्या वादात यातील काही संचालक सहभागी होते. त्यांनी जुना राग चार वर्षांनंतर काढल्याची चर्चा आहे.
चार अधिकाऱ्यांना हटविण्यासाठी वाद
By admin | Published: August 21, 2016 12:19 AM