फोटो - विटा महावितरण आंदोलन ०२ : विटा येथे शेतकऱ्यांनी महावितरणवर मोर्चा काढल्यानंतर कार्यकारी अभियंता विनायक इदाते यांच्याशी चर्चा केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : वीज बिलात सवलत द्यावी व शेतीसह घरगुती वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई तातडीने थांबवावी, या मागणीसाठी सोमवारी शेतकरी आक्रमक झाले. आंदोलनकर्त्यांनी येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक मारली. त्यावेळी मुख्य प्रवेशद्वारात आंदोलक व पोलिसांची वादावादी झाली. त्यामुळे तणाव निर्माण झाला.
महावितरणने थकीत वीज बिलासाठी कृषी पंपासह घरगुती ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई थांबवावी यासाठी डायमंड ग्रुपचे अध्यक्ष शंकर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांना मुख्य प्रवेशद्वारातच रोखले. त्यामुळे आंदोलक आक्रमक झाले. शंकर मोहिते, फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष विजय मोहिते, शिवप्रताप ॲग्रोटेकचे अध्यक्ष विठ्ठलराव साळुंखे, संग्राम माने, दिशांत धनवडे, विनोद पाटील, दीपक शितोळे, तानाजी मोहिते, विद्याधर कुलकर्णी, नाना लिपारे यांच्यासह शेतकरी व वीज ग्राहकांनी अंगावरील शर्ट काढून तेथेच ठिय्या मारला. त्यावेळी महावितरणच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता विनायक इदाते यांच्याशी चर्चा केल्यानंतर आंदोलकांना महावितरण कार्यालयात चर्चा करण्यासाठी पाठविण्यात आले. खा. संजयकाका पाटील यांनी दूरध्वनीवरून अभियंता इदाते यांच्याशी चर्चा केली. जिल्हाधिकारी व महावितरणचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी बैठक होईपर्यंत वीज कनेक्शन तोडू नयेत, असा तोडगा निघाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.