तासगाव : तासगाव तालुक्यात राजकीयदृष्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या किंदरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचासह इतर तीन सदस्यांवर सरकारी जागेत अतिक्रमण केल्याप्रकरणी अपात्रतेची कारवाई करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.तासगाव तालुक्यातील किंदरवाडी ही सात सदस्यसंख्या असलेली ग्रामपंचायत आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीत ही ग्रामपंचायत झाली होती. मात्र, तक्रारदार नारायण सूर्यवंशी व प्रशांत सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे चार सदस्यांविरोधात तक्रार अर्ज दाखल केला होता. यात म्हटले होते की, किंदरवाडी ग्रामपंचायतच्या चार सदस्यांनी सरकारी जागेत अतिक्रमण केले असून सरकारी जागेचा बेकायदा वापर व उपभोग घेतला आहे. त्यामुळे कायद्याने अपात्र असल्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे. यासाठी ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १६ व १४ (१) (ज ३) चा संदर्भ देण्यात आला.या अर्जावर जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या दालनात वेळोवेळी सुनावणी झाली. अर्जदारांनी सादर केलेली कागदपत्रे तपासून जिल्हाधिकाऱ्यांनी अर्जदारांचा विवाद अर्ज मंजूर करून सरपंच राजश्री कचरे, अनिता कचरे, धोंडीराम कचरे व शोभा जाधव या चार सदस्यांना सदस्यपदी राहण्यास अपात्र ठरवत त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिले. या आदेशात संबधितांना प्रस्तूत आदेशाविरुद्ध विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे अपील दाखल करण्यास १५ दिवसांचा अवधी देत असल्याचे म्हटले आहे.पोटनिवडणूक की प्रशासकराज?ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह तीन सदस्यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्रतेची कारवाई केल्याने तासगाव तालुक्यात राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईनंतर संबंधितांच्या प्रभागात पोटनिवडणूक लागणार की ग्रामपंचायतीवर प्रशासकराज येणार? याकडे लक्ष लागले आहे.
सरकारी जागेत अतिक्रमण, सांगली जिल्ह्यातील किंदरवाडीत सरपंचांसह तीन सदस्यांवर अपात्रतेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2023 5:00 PM