सांगली : सांगली बाजार समितीमध्ये जमीन खरेदी, विष्णूअण्णा फळ मार्केटमधील गाळे विक्री, कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमध्ये घोटाळा झाला आहे. या प्रकरणाची चौकशी चालू झाली आहे. हा घोटाळा बाजार समितीचे विद्यमान सभापती व संचालक मंडळाच्या कालावधीत झाल्यामुळे त्यांना बाजार समितीची निवडणूक लढविण्यास बंदी घालावी, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी पणन संचालकांकडे केली आहे.फराटे यांनी पणन संचालकांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, बाजार समितीच्या मंडळाने सावळी (ता. मिरज) येथील जमीन खरेदी, उमदी (ता. जत) येथील जमीन खरेदी, नोकर भरती व पदोन्नती, सेसमध्ये कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा झाला आहे. हा सर्व घोटाळा विद्यमान संचालकांच्या कालावधीत झाला आहे. जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशानुसार सध्या चौकशी चालू आहे. बाजार समितीची गरज नसतांना कोट्यावधी रुपयांची बांधकामे करुन ठेवली आहेत. जागा खरेदीतही मोठा गैरव्यवाहार आहे.जिल्हा उपनिबंधक यांनीही संबंधित चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठित करून चौकशीचे आदेश दिले आहेत. या घोटाळ्याची चौकशी होईपर्यंत बाजार समितीचे सभापती व संचालकांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले पाहिजे, अशी मागणी पणन संचालक यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.पणन संचालकांनी सखोल चौकशी करुन दोषी सभापती आणि संचालकांवर कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही फराटे यांनी दिला आहे.कर्मचारी सेवा संस्थांचे संचालक कसे?कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही कर्मचारी नोकरीत असतानासुद्धा सेवा संस्थांचे संचालक आहेत. या कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या पदाचा अथवा नोकरीचा राजीनामा दिलेला नाही. हे कर्मचारी निवडणूक नियमांचे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे अशा नोकरीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणीही सुनील फराटे यांनी केली आहे.
सांगली बाजार समिती निवडणुकीत सभापती, संचालकांना अपात्र ठरवा; पणन संचालकांकडे केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2022 2:13 PM