भाजप, शिवसेना तपाशी; महाआघाडी उपाशी, सांगलीत निधी वाटपावरुन विरोधी गटाच्या आमदारांमध्ये नाराजी

By अशोक डोंबाळे | Published: December 27, 2023 04:17 PM2023-12-27T16:17:05+5:302023-12-27T16:17:43+5:30

अशोक डोंबाळे सांगली : जिल्हा नियोजनच्या १०० कोटी रुपयांच्या निधी वाटपामध्ये पालकमंत्री २० टक्के, भाजप, शिवसेना (शिंदे गट)ला प्रत्येकी ...

Dissatisfaction among the MLAs of the opposition group over the allocation of funds in Sangli district planning | भाजप, शिवसेना तपाशी; महाआघाडी उपाशी, सांगलीत निधी वाटपावरुन विरोधी गटाच्या आमदारांमध्ये नाराजी

भाजप, शिवसेना तपाशी; महाआघाडी उपाशी, सांगलीत निधी वाटपावरुन विरोधी गटाच्या आमदारांमध्ये नाराजी

अशोक डोंबाळे

सांगली : जिल्हा नियोजनच्या १०० कोटी रुपयांच्या निधी वाटपामध्ये पालकमंत्री २० टक्के, भाजप, शिवसेना (शिंदे गट)ला प्रत्येकी ३० टक्के आणि महाविकास आघाडीच्या आमदारांना २० टक्के निधीचे वाटप केले आहे. या निधी वाटपामध्ये शिवसेना, भाजपची सरशी असून महाविकास आघाडीच्या आमदारांना डावलले आहे. यावरून विरोधी गटाच्या आमदारांमध्ये नाराजीचा सूर आहे.

जिल्हा नियोजनच्या १०० कोटी रुपयांच्या निधी वाटपाचे नियोजन पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केले आहे. या निधीचे वाटप जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये आमदारांच्या सहमतीनेच होते. सत्तेत असणारे आमदार आणि पालकमंत्री जिल्हा नियोजनच्या निधीवर सर्वाधिक हक्क सांगतात. त्यानुसार खाडे यांनी जिल्ह्यात जनसुविधांवर ३२ कोटी ५६ लाख, तीर्थक्षेत्र विकास योजनेसाठी सात कोटी ६३ लाख, ग्रामीण रस्त्यांसाठी २९ कोटी ३२ लाख, जिल्हा मार्ग रस्त्यांसाठी ३० कोटी ४९ लाख रुपयांची कामे करण्याचे नियोजन केले आहे. या निधीचे आमदारांना वाटप करताना पालकमंत्री यांच्यासाठी २० टक्के निधी म्हणजे १३ कोटी २१ लाख रुपये घेतले आहेत. 

भाजप खासदार, आमदारांसाठी ३० टक्के निधी म्हणजे १९ कोटी ८१ लाख रुपये दिले आहेत. यामध्ये आमदार म्हणून सुरेश खाडे यांना पुन्हा चार कोटी ९५ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. खासदार आणि उर्वरित भाजपच्या दोन आमदारांना निधीचे वाटप केले आहे. शिवसेना (शिंदे गट)चे खानापूरचे एकमेव आमदार अनिल बाबर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांना ३० टक्के म्हणजे १९ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. 

महाविकास आघाडीचे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, सुमनताई पाटील, अरुण लाड, प्रा. जयंत आसगावकर, डॉ. विश्वजित कदम, विक्रमसिंह सावंत असे सात आमदार आहेत. या आमदारांना जिल्हा नियोजनमधून २० टक्के म्हणजे १३ कोटी २१ लाख रुपयांचा निधी दिला आहे. जिल्हा नियोजनच्या निधी वाटपात मोठी विषमता निर्माण झाल्यामुळे महाविकास आघाडीच्या आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

असे झाले निधीचे वाटप

पालकमंत्री -  १३.२१ कोटी
खासदार संजय पाटील - ५.९४ कोटी
आमदार सुरेश खाडे - ४.९५ कोटी
आमदार सुधीर गाडगीळ - ४.९५ कोटी
आमदार गोपीचंद पडळकर - ३.९६ कोटी
खासदार धैर्यशील माने - ९.९० कोटी
आमदार अनिल बाबर - ९.९० कोटी
आमदार जयंत पाटील - २.११ कोटी
आमदार विश्वजित कदम - २.११ कोटी
आमदार मानसिंगराव नाईक - २.११ कोटी
आमदार विक्रमसिंह सावंत - २.११ कोटी
आमदार सुमनताई पाटील - २.११ कोटी
आमदार अरुण लाड - १.७२ कोटी
आमदार प्रा. जयंत आसगावकर - ९२ लाख

असा होणार निधी खर्च

जनसुविधा ३२.५६ कोटी
तीर्थक्षेत्र विकास ७.६३ कोटी
ग्रामीण रस्ते २९.३२ कोटी
जिल्हा मार्ग रस्ते ३०.४९ कोटी

Web Title: Dissatisfaction among the MLAs of the opposition group over the allocation of funds in Sangli district planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.