अशोक डोंबाळे
सांगली : महाविकास आघाडीमध्ये खानापूर, मिरज व सांगलीच्या जागेवरून वादंग होण्याची चिन्हे आहेत. खानापूर, मिरज विधानसभा मतदारसंघांवर उद्धवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने दावा सांगितल्यामुळे नेत्यांमध्ये नाराजी नाट्य निवडणूकीपूर्वीच रंगले आहे. महायुतीमध्ये सध्या तरी वादळापूर्वीची शांतता आहे. सांगली, मिरज, शिराळा, जतमध्ये भाजपला अंतर्गत गटबाजीचाच सर्वाधिक फटका बसणार आहे.विधानसभा निवडणुकांसाठी ऑक्टोबरपासून आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने मतदारयादी करण्यासह निवडणुकीची पूर्णतयारी केली आहे. महाआघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनीही विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. महाआघाडीस लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते मोठ्या जोशात विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीमध्ये प्रमुख काँग्रेस, उद्धवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा समावेश आहे. काँग्रेसची सध्या सांगली, पलूस-कडेगाव, मिरज आणि जतमध्ये मजबूत बांधणी आहे. यामुळे काँग्रेसचे खासदार विशाल पाटील, आमदार डॉ. विश्वजित पाटील यांनी सांगली, पलूस-कडेगाव, जत, मिरज विधानसभेबरोबरच खानापूर विधानसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे. येथून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनराव कदम यांचे नातू व काँग्रेसचे युवा नेते जितेश कदम तयारी करत आहेत. शरदचंद्र पवार गटाचे शिराळा, इस्लामपूर आणि तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघावर वर्चस्व असून, येथे त्यांचे विद्यमान आमदार आहेत. या तीन जागा सोडून मिरज, खानापूर आणि जत विधानसभेच्या जागांवर शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दावा केला आहे. उद्धवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सध्या तरी सांगली, मिरज आणि खानापूर विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे; पण खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार असल्यामुळे तो मतदारसंघ त्यांच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये खानापूर आणि मिरज विधानसभा मतदारसंघावरून संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.महायुतीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असे प्रमुख तीन पक्ष आहेत. याशिवाय, काही छोटे पक्ष, संघटनाही त्यांच्या सोबत आहेत; पण विधानसभा निवडणुकीत त्याच्या वाट्याला महायुतीचे मोठे पक्ष जागा सोडण्याची शक्यता फारच कमी आहे. भाजपचे सांगली, मिरज विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार आहेत; पण पक्षांतर्गत बंडाळीमुळे सांगली, मिरजेच्या जागा टिकविण्याचे भाजपसमोर मोठे आव्हान आहे.शिराळा, जत, खानापूर विधानसभा मतदारसंघातही भाजप नेत्यांमध्येच कुरघोड्याचे राजकारण रंगले आहे. शिवसेना शिंदे गटाने सध्या तरी खानापूर विधानसभा मतदारसंघावर हक्क सांगितला आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे सध्या तरी तासगाव-कवठेमहांकाळ, शिराळा, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघावर लक्ष ठेवले आहे. यापैकी एखादा मतदासंघ मिळू शकतो.
महायुतीने या विधानसभांवर केला दावामहायुतीमध्ये भाजपने सांगली, मिरज, पलूस-कडेगाव, जत, शिराळा, इस्लामपूर मतदारसंघावर, तर शिवसेना शिंदे गटाने खानापूर, राष्ट्रवादी अजित पवार गटाने तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे.
महाविकास आघाडीने या विधानसभांवर केला दावाकाँग्रेसने सांगली, मिरज, पलूस-कडेगाव, जत, खानापूर मतदारसंघावर, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने शिराळा, इस्लामपूर, तासगाव-कवठेमहांकाळ, मिरज, खानापूर मतदारसंघावर दावा केला आहे. उद्धवसेनेकडूनही खानापूर, मिरज, सांगली विधानसभेवर दावा केला आहे.