इस्लामपूर येथे शिवसेनेच्यावतीने देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरचे वितरण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नितीन बानुगडे-पाटील, आनंदराव पवार, डॉ. नरसिंह देशमुख, डॉ. राणोजी शिंदे, विजय देशमुख उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कोरोनाच्या संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे पालकत्व स्वीकारत अत्यंत संयमाने जनतेची काळजी घेतली आहे. त्यांच्या कामाची पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालय आणि जागतिक आरोग्य संघटनेने दखल घेत कौतुक केले आहे. मात्र, राज्यातील काही असंतुष्ट आत्मे अशा काळातही महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत, असा टोला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भाजपच्या नेत्यांना लगावला.
येथील शिवसेनेच्या जिल्हा संपर्क कार्यालयात उपजिल्हा रुग्णालयासह दोन खासगी रुग्णालयांना तीन व्हेंटिलेटर सामंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, संजय विभुते, प्रांताधिकारी विजय देशमुख, उपजिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. नरसिंह देशमुख, डॉ. राणोजी शिंदे उपस्थित होते.
सामंत म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेवरून शिवसेनेच्यावतीने सामाजिक बांधिलकी म्हणून ही मदत दिली जात आहे. या मदतीचा वापर योग्य पद्धतीने होण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष द्यायला हवे. या व्हेंटिलेटरचा वापर कमीत कमी व्हावा, इतके चांगले आरोग्य इथल्या जनतेला मिळावे.
यावेळी नगरसेवक शकील सय्यद, प्रदीप लोहार, युवा सेनेचे उमेश पवार, दि. बा. पाटील, नंदकुमार नीळकंठ, सागर मलगुंडे, घनशाम जाधव, युवराज निकम, सुभाष जाधव, रणजित शिंदे, प्रताप खराडे, सचिन कुचीवाले, अंकुश माने, तहसीलदार दीक्षांत देशपांडे उपस्थित होते.
चौकट
शहरातील आरोग्य व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त करताना मंत्री उदय सामंत यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाचे कौतुक केले. रुग्णालयाने मृत्यूचा दर कमी ठेवून इतरांसमोर आदर्श ठेवल्याचे सामंत यांनी सांगितले.