हणमंत देसाई --रांजणी --कवठेमहांकाळ पूर्व भागातील रांजणी, अग्रण, लोणारवाडी, पिंपळवाडी, अलकूड (एस), नांगोळे, कोकळे, बसाप्पाचीवाडी परिसरात दोन वर्षापूर्वी खोदलेले म्हैसाळ योजनेचे पोटकालवे शेतकऱ्यांसाठी ‘असून अडचण’ ठरत आहेत. योजना सुरू करण्याबाबतच्या तांत्रिक अडचणी, लोकप्रतिनिधींची उदासीनता, अधिकाऱ्यांमध्ये इच्छाशक्तीचा अभाव यामुळे पाण्याअभावी निरूपयोगी ठरत असलेले कालवे शेतकरी भर टाकून मुजवताना दिसत आहेत.माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी विशेष प्रयत्न करून पूर्व भागातील रांजणी, अग्रण, लोणारवाडी, पिंपळवाडी, अलकूड (एस), नांगोळे, कोकळे, बसाप्पाचीवाडी या गावांसाठी पोटकालव्यांची कामे मार्गी लावली. आर. आर. पाटील यांनी तर दोन वर्षापूर्वी ‘तालुक्यातील हा शेवटचा दुष्काळ’ अशी ग्वाही देत नांगोळे ते रांजणी रेल्वे फाटक असा पाच किलोमीटरचा मुख्य कालवा व या सहा गावांसाठी सुमारे २५ किलोमीटरच्या पोटकालव्यांची कामे तातडीने मार्गी लावली. यासाठी सुमारे २० कोटी रूपये खर्च झाले. मात्र त्यानंतर दोन वर्षे उलटूनही आजअखेर पाटबंधारे विभागाने पाणी सोडून कालव्यांची साधी चाचणीही घेतली नाही.पोटकालव्यांमध्ये अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींचे तुकडे पडले आहेत. शेतीच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी अनेकांना एक ते दीड किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. ‘पाणी मिळणार’ या आशेने दुष्काळाने ग्रासलेल्या शेतकऱ्यांनी कालव्यासाठी जमीन देताना फारसे आढेवेढे घेतले नाहीत. पण दोन वर्षे उलटूनही पाणी तर नाहीच, शिवाय जमीनही गेली. तसेच एकाच शेताचे दोन तुकडे कसताना होणारी तारांबळ, याला वैतागून अनेक ठिकाणी शेतकरी भर टाकून कालवे मुजविताना दिसत आहेत. या योजनेमुळे रांजणीतील ८०५ हेक्टर, अग्रण धुळगाव येथील ६६६ हेक्टर, लोणारवाडीतील १०१ हेक्टर, पिंपळवाडी येथील १२१ हेक्टर, अलकूड एस येथील ११९ हेक्टर, तर नांगोळे येथील ७६.३१ हेक्टर अशी सुमारे दोन हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. याशिवाय या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही कायमस्वरूपी निकालात काढण्यास मदत होणार आहे. पण कालव्यांच्या खुदाईनंतर पाटबंधारे विभागाकडून पुढील कामांबाबत कोणतीच हालचाल झालेली नाही. अस्तरीकरण तर दूरच, पाणी सोडून साधी चाचणीही केली गेली नाही. तातडीने हालचाली न झाल्यास दोन वर्षापूर्वी खोदलेले कालवे पुढच्या काही दिवसांमध्ये पुन्हा खोदावे लागतील, अशी स्थिती आहे.‘टेंभू’ही अर्धवट : भरीव निधीची गरजकेवळ म्हैसाळ योजनेच्या पाण्यामुळे येथील सर्व शेती सिंचनाखाली येऊ शकणार नाही. यासाठी टेंभू योजनेची प्रलंबित कामेही पूर्ण होणे गरजेचे आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात टेंभू योजनेची ४१ किलोमीटरची कामे प्रस्तावित आहेत. यापैकी केवळ ५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. सध्या ५ ते १७ किलोमीटरच्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर असून लवकरच नागजपर्यंत पाणी देता येईल, असे पाटबंधारेचे अधिकारी सांगत असले तरी, पुढील २५ किलोमीटरच्या टप्प्यासाठी भरीव निधीची तरतूद गरजेची आहे. पाणीपट्टी भरण्याची शेतकऱ्यांची तयारीम्हैसाळ योजनेच्या पाणीपट्टीचा, वीज बिलाचा प्रश्न वारंवार चर्चेत येतो. वेळेवर, पूर्ण क्षमतेने पाणी मिळावे, पाणीपट्टी भरण्याची आमची तयारी आहे, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहे. योजनेची अनेक कामे अपूर्ण आहेत. टंचाई निधीतून वीजबिल भरून योजना सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
‘निरुपयोगी’ कालवे भर टाकून मुजविले
By admin | Published: December 06, 2015 11:16 PM