सांगली : राज्यभर फिरून सांगलीत आलेल्या राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेत स्थानिक नेत्यांमध्येच विसंवादाचे व गटबाजीचे दर्शन घडले. पक्षात वाद आहेत याची कल्पना प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना काही कार्यकर्त्यांनी दिल्यानंतर ‘थोडे वाद असायला हवेत’, अशा शब्दांत गटबाजीच्या प्रकारावर जयंत पाटील यांनी पडदा टाकला.
माधवनगर रोडवरील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या सभागृहात मंगळवारी दुपारी राष्ट्रवादीचा संवाद कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आ. अरुण लाड, युवा नेते प्रतीक पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष पद्माकर जगदाळे, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, शरद लाड, युवती आघाडीच्या सुलक्षणा सलगर, सुनील गव्हाणे, रविकांत वरपे, मेहबूब शेख, आदी उपस्थित हाेते.
कार्यक्रमाच्या ठिकाणी जयंत पाटील यांच्या स्वागतासाठी दोन ठिकाणी दोन वेगवेगळे गट थांबून होेते. संवाद यात्रेच्या नियोजनातच गोंधळ दिसून आला. सांगली विधानसभा क्षेत्रासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, शहर जिल्हाध्यक्ष बजाज यांनी आढावा मांडण्यास सुरुवात केली. बजाज यांना त्यांनी मध्येच थांबवून हा विधानसभा क्षेत्राचा कार्यक्रम असल्याचे स्पष्ट करीत, या क्षेत्राचे पक्षाचे अध्यक्ष पद्माकर जगदाळे यांना आढावा मांडण्याची सूचना त्यांनी केली.
जयंत पाटील यांना स्थानिक पातळीवर गटांमध्ये वाद असल्याचे पक्षात नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले. त्याचा उल्लेख करीत जयंत पाटील म्हणाले की, पक्षात सर्व काही चांगले असेल तर दृष्ट लागते. त्यामुळे थोडे वाद असायला हवेत. त्यामुळे काळजी करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
प्रदेश उपाध्यक्ष मागच्या रांगेत
पक्षीय शिष्टाचाराप्रमाणे व्यासपीठावर बैठक व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले सुरेश पाटील मागच्या रांगेत व युवक शहरचे पदाधिकारी पुढील रांगेत बसले होते. त्याचीही चर्चा उपस्थितांत रंगली होती.
सांगलीत मुक्कामास येतो
जयंत पाटील यांच्याशी थेट संवाद साधता येत नाही, त्यांची भेट होत नाही, अशी तक्रार काहींनी केली होती. त्याचा उल्लेख करीत जयंत पाटील म्हणाले, संवाद यात्रा संपल्यानंतर मी सांगलीला मुक्कामालाच येणार आहे. तेव्हा आपण चर्चा करू.