सांगली : दिवसेंदिवस वाढत जाणारी सिमेंटची जंगले...पार्किंगच्या जागांअभावी विकसित होणाऱ्या निवासी इमारती, अतिक्रमणे यातून वादाच्या ठिणग्या पडत आहेत. या ठिणग्यांमधून आता वाहने पेटविण्याच्या घटना समोर येत आहेत. सांगलीत ही नवी विकृती जन्माला येत आहे.
महापालिकेचे या प्रश्नांकडे होत असलेले दुर्लक्षही विकृती वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. महापालिकेकडे रस्त्यावरील पार्किंगची तक्रार केली तर त्याची दखल घेतली जात नाही. ज्या वाहनधारकांना रात्रीपुरती गाडी लावायची आहे, त्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न महापालिकेकडून होत नाही. यातून ज्याचा वाहन लावण्यास विरोध आहे, अशांकडून वाहने पेटविण्याचे प्रकार घडत आहेत. बऱ्याचदा वैयक्तिक वादातूनही अशा घटना घडत असल्या तरी वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न यातून गंभीर होत आहे.
आयुष्यभर कष्ट करून, कर्ज काढून एखादे कुटुंब वाहन खरेदी करीत असते आणि रातोरात त्याची राख झालेली पाहणे हे किती वेदनादायी आहे, याची कल्पना विकृत लोकांना येणार नाही. त्यामुळे महापालिकेकडून पार्किंगशिवाय इमारतींना परवानग्या देणे बंद झाले पाहिजे. खाबुगिरीतून असे परवाने दिले जातात आणि नव्या संकटांना निमंत्रण मिळते. महापालिकेने गेल्या कित्येक वर्षांत पार्किंगची एक जागा विकसित केली नाही. बहुमजली पार्किंगच्या इमारतीच्या केवळ गप्पा मारण्यात आल्या. महापालिकेची भूमिका अशीच राहिली तर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. त्यामुळे महापालिकेने वेळीच याबाबत पाऊल उचलणे गरजेचे आहे.
चौकट
कशामुळे निर्माण झाला प्रश्न
महापालिका क्षेत्रातील ७० टक्के इमारतींच्या पार्किंगच्या जागी व्यवसाय
जागा नसल्याने रस्त्यांवर लावली जातात वाहने
दुसऱ्यांच्या जागेत वाहने लावल्याने वादाचे प्रश्न
शहरात बहुमजली किंवा व्यावसायिक पार्किंगची सोय नाही
रहिवाशांकरिता स्वतंत्र सोय आवश्यक
चौकट
यापूर्वीही घडल्या घटना
जिल्ह्यात शंभर फुटी, संजयनगर, गावभाग या गर्दीच्या ठिकाणी वाहने पेटविल्याच्या घटना घडल्या आहेत. वारंवार या घटना घडत असताना त्याविषयी कोणीही पाऊल उचलत नाही.