सांगली : जिल्ह्यात ४३ हजार ३१८ पूरबाधित कुटुंबे असून आतापर्यंत ४५९ कुटुंबांना प्रति दहा किलोप्रमाणे गहू, तांदूळ वाटप करण्यात आले आहेत. यात ४.५९ टन गहू, ४.५९ टन तांदळाचे वाटप करण्यात आले. यात सांगली ग्रामीण ४७ कुटुंबे, मिरज ४५, वाळवा १०५, आष्टा १८, शिराळा २४४ अशा ४५९ कुटुंबांचा समावेश आहे. तूर डाळ व केरोसिन उपलब्ध झाल्यास त्यांचेही वाटप करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.
--------------
टीईटीची १० ऑक्टोबरला परीक्षा
सांगली : राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीची परीक्षा १० ऑक्टोबर रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी दिली. पहिली ते पाचवी व ६वी ते ८वीच्या शाळांमध्ये शिकविण्यासाठी व शिक्षण सेवक पदासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असते. या परीक्षेची ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक ३ ते २५ ऑगस्टपर्यंत आहे.
-----
जिल्ह्यातील १९ रस्त्यांवरील वाहतूक बंदच
सांगली : गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व महापूरस्थितीमुळे पाण्याखाली गेलेले अथवा खराब झालेले १९ रस्ते अद्यापही वाहतुकीसाठी बंदच आहेत. यात पुराचा फटका बसलेल्या गावांसह अतिवृष्टीचा सामना करावा लागलेल्या तालुक्यातील रस्त्यांचाही समावेश आहे. यात मिरज, वाळवा, पलूस, तासगाव आणि खानापूर तालुक्यातील रस्त्यांचा समावेश आहे.